Puducherry Assembly Election Result 2026: पुद्दुचेरीमध्ये एनडीए आघाडीने विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली असून, केंद्रशासित प्रदेशातील ३० पैकी १८ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत समोर आलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेस (एआयएनआरसी) १२ जागांवर आघाडीवर असून, त्यापैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपाने चार जागी आघाडी घेतली पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. पुदुचेरीत एनडिए आघाडी स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

विधानसभेच्या ३० जागा

पुद्दुचेरीमध्ये, ३० विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या केंद्रशासित प्रदेशात सहा ठिकाणी मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. हे मतदारसंघ पुदुचेरी (२३), कराईकल (०५), माहे (०१) आणि यानम (०१) या भागांमध्ये विभागलेले आहेत. सोमवारी (४ मे, २०२६) पुदुचेरीत मतमोजणीला सुरुवात झाली. विधानसभेच्या ३० जागांसाठी २९४ उमेदवार रिंगणात होते.

कोणाची कोणाबरोबर युती?

एनडीए – एआयएनआरसी, भाजपा, एआयएडीएमके आणि एलजेके
इंडिया ब्लॉक – काँग्रेस, डीएमके आणि व्हीसीके
आणि थलपती विजय यांचा टीव्हीके पक्ष स्वतंत्र लढत होता.

Puducherry Election Result 2026
Puducherry Election Result 2026 (फोटो – Election Commission)

कोणाला किती जागा मिळाल्या आहेत?

एआयएनआरसी – १२ जागांवर आघाडी – १० विजयी
डीएमके – ५ जागांवर आघाडी सर्व विजयी
भाजपा – ४ जागांवर आघाडी ०३ विजयी
टीव्हीके – दोन जागांवर आघाडी दोन्ही विजयी
काँग्रेस – ०१ विजयी
एलजेके – ०१ विजयी
एडीएमके – ०१ विजयी
एनवायएमके – ०१ विजयी
इतर – ०३ विजयी

एन. रंगस्वामी विजयी

पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री आणि अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. रंगस्वामी यांनी थट्टानचावडी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आपले राजकीय सामर्थ्य सिद्ध केले आहे. त्यांनी ४,४४१ मतांच्या निर्णायक फरकाने दणदणीत विजय मिळवत मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले आहे. ७५ वर्षीय एन. रंगस्वामी पाचव्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताल. रंगस्वामी यांनी वाणिज्य आणि कायद्याची पदवी घेतली आहे. के. कामराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी वकिली सोडून राजकीय कारकीर्द सुरू केली. रंगस्वामी त्यांच्या साध्या जीवनशैलीसाठी आणि लोकांसाठी सहज उपलब्ध असण्यासाठी ओळखले जातात.