पुद्दुचेरीमधील एका क्रिकेट प्रशिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ वर्षीय महिला क्रिकेटपटूचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून मेटुपालयम पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव थारमारई कान्नन आहे. पीडिता ही क्रिकेट प्रशिक्षणासाठी थारमाई कान्नकडे जात होती, या दरम्यान तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याप्रकरणी मेटुपालयम पोलिसांनी गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतरही कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ पुद्दुचेरीचे प्रतिनिधी, ज्यामध्ये अध्यक्ष दामोधरन, रोहित दामोधरन(पुद्दुचेरी वरिष्ठ पुरुष संघाचे कर्णधार आणि चित्रपट दिग्दर्शक शंकर यांचे जावाई), सचिव व्यंकट आणि प्रशिक्षक जयकुमार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पद्दुचेरी पोलिसांनी सांगितले की ही घटना एप्रिल महिन्यात घडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी इंडिय एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, आरोपी कन्नन याने पीडितेला अयोग्य मेसेज पाठवले होते.

पोलीस अधिकाऱ्याने ही देखील माहिती दिली की, क्रिकेट असोशिएशनकडून कुठलीही कारवाई करण्यात न आल्याने, पीडितेने बालकल्याण समितीशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी तिची तक्रार दाखल करण्यास तिला मदत केली.