भाज्यांपाठोपाठ आता डाळींच्या किमतीतही दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. तूर आणि मूग डाळीने शंभरी पार केली असून पुन्हा काही भाज्यांचे दर वधारल्याचे दिसून येत आहे, तर खाद्यतेलाच्या किमतीत गेल्या तीन महिन्यांत ३५ टक्के वाढ झाली. इंधन दरवाढीमुळे हे घटक महाग झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
ठाणे, मुंबई तसेच आसपासच्या शहरांत डाळींच्या किमतीत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे, तर तूर आणि मूग डाळ शंभरी पार गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ सध्या ११० ते १२० रुपये किलोने विक्री केली जात आहे, तर ९० ते १०० रुपये किलोने विकली जाणारी मूग डाळ सध्या १०० ते १२० रुपये किलोने विक्री केली जात आहे. उडीद डाळ, चणा डाळ, मसूर डाळ तसेच ज्वारी यांच्या दरातही वाढ झाली असून सद्य:स्थितीला किरकोळ बाजारात ३५ ते १२५ रुपये किलोने यांची विक्री केली जात आहे. भाज्यांपाठोपाठ आता डाळींच्या किमतीही वधारल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून त्यांच्यामधून या महागाईविरोधात संताप व्यक्त केला जात आहे, तर इंधन दरवाढीमुळे भाज्या आणि डाळींचे दर वधारले असल्याचा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.
कांदा, टोमॅटो..
कांद्याची दरवाढ २१ टक्के झाली असून टोमॅटोचे दर ११ टक्के वाढले आहेत. खाद्य तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. कांद्याचे भाव तिसऱ्या आठवडय़ात क्विंटलला ४ हजार रुपये किलो होते ते आता ३० टक्के कमी होऊन क्विंटलला २६५० रुपये झाले आहेत. खाद्य तेलांच्या किमती गेल्या आठवडय़ात जागतिक बाजारात दीड टक्क्य़ांनी कमी झाल्या आहेत. इन्स्टिटय़ूट स्टडीज इन कॉम्प्लेक्स चॉइसेस या संस्थेचे प्राध्यापक अनिल कुमार सूद यांनी म्हटले आहे,की जागतिक पातळीवर सरसकट दर वाढले आहेत.
महिन्यात देशातील स्थिती..
अन्न-धान्याची देशभरात महिन्याभराच्या काळात २.७ ते ३.७ टक्के इतकी दरवाढ झाली. कांदा,टोमॅटो, मोहरीचे तेल यात मोठी दरवाढ झाली आहे. इंधनदर व पिकांना सहन न झालेले वाढते तापमान , त्यामुळे उत्पादनावरील परिणाम झाला आहे. १२ मार्चला फेब्रुवारीतील महागाईचा अहवाल सरकार जाहीर करणार असून त्यात हेच चित्र असेल.
खाद्यतेल..
वनस्पती तेलाच्या किमती २०२० च्या तिसऱ्या तिमाहीत ३५ टक्के वाढल्या आहेत. जानेवारी २०२१ मध्येही त्यात १० टक्के वाढ झाली. भारताने नोव्हेंबर २०२० मध्ये आयात शुल्क कमी केल्याने देशातील किमतींवर त्याचा परिणाम झाला. मालवाहतुकीचे दरही वाढले असून गेल्या महिन्यात तर ते उच्चांकी झाले.
..तर आणखी वाढ..
सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर वाढवल्याने अन्न घटकांची महागाई अटळ होती. कारण मधल्या साखळीतील वाढलेला खर्च शेवटी ग्राहकावर टाकला जातो. ट्रकभाडयात दोन अंकी वाढ झाली असून भाज्यांच्या किमती किलोमागे आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
