पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आयात शुल्कात २०० टक्के वाढ केली. याचा परिणाम पाकिस्तानातली वृत्तपत्र विकणाऱ्यांच्या व्यवयासावरही झाला आहे. मुंबईतल्या मोहम्मद अली रोड भागात नाझ बुक डेपो आहे. हा बुक डेपो मोहम्मद आसिफ चालवतात. नाझ बुक डेपो हा ७० वर्षांपूर्वी मोहम्मद यांचे वडील अब्दुल्लाह हाजी अली मोहम्मद यांनी सुरू केला होता. या बुक डेपोमध्ये उर्दू आणि इंग्रजी वृत्तपत्रं मिळतात. आणि हेच या बुक डेपोचे खास वैशिष्ट्यही आहे. पुलवामा हल्ल्यानंतर १९ फेब्रुवारीला कराचीहून मुंबईत आलेला पाकिस्तानी वृत्तपत्रांचा गठ्ठा घेण्यासाठी आसिफ गेले तेव्हा पुढे काय वाढून ठेवले आहे त्यांना ठाऊक नव्हते.

पाकिस्तानी वृत्तपत्रांचे गठ्ठे आणण्यासाठी जेव्हा आसिफ गेले तेव्हा त्यांना २ लाखांचा भरणा करण्यास सांगितले. खरेतर ४० किलोंचे गठ्ठे घेऊन ते विकल्यावर साधारण ५ हजारांचा व्यवसाय होतो असे आसिफ यांनी सांगितले. मात्र १९ फेब्रुवारीला म्हणजेच पुलवामा हल्ल्यानंतर जेव्हा आसिफ मुंबई विमानतळावर आलेले पाकिस्तानी वृत्तपत्रांचे गठ्ठे घेण्यासाी गेले तेव्हा त्यांना आयात शुल्क म्हणून २ लाख रूपये भरण्यास सांगितले. पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वृत्तपत्रांवर, मासिकांवर कोणताही कर नव्हता. मात्र हा कर थेट २०० टक्के झाल्याने आम्हाला २ लाखांचा भरणा करण्यास सांगण्यात आले असे आसिफ यांनी म्हटले आहे. आता २ लाख रूपये भरून जर आम्ही पाकिस्तानची वृत्तपत्रं घेतली तर ग्राहक आम्हाला एका वृत्तपत्राचे ४५० रुपये देऊ शकतील का? असा प्रश्न आसिफ यांनी उपस्थित केला.

नाझ बुक डेपोतून पाकिस्तानी वृत्तपत्रं खरेदी करणारे काही ग्राहक आहेत. ज्यांचे नातेवाईक पाकिस्तानात रहातात. ज्यांना पाकिस्तानात काय चाललं आहे याची माहिती हवी असते असे अनेकजण मोहम्मद आसिफ यांच्या बुक स्टॉलवरून हे पेपर घेत असतात. मात्र २ लाखांचा भरणा करायला सांगितल्यावर वृत्तपत्रांची किंमत ४५० रुपये कुणी मोजेल का? असा प्रश्न आसिफ यांनी विचारला आहे.
तसेच आपण रिकाम्या हातीच परतलो असेही आसिफ यांनी म्हटले आहे. त्यांच्या दुकानात हजेरी लावणाऱ्या ग्राहकांनी निवडणुका झाल्या की हे धोरण बदलेल असे म्हटले आहे. मात्र कोणीही आसिफ यांना खात्रीलायक माहिती दिलेली नाही.

वडिलांच्या काळापासून नाझ बुक डेपो सुरु असणारे मोहम्मद आसिफ हे कायम विविध देशांमधून वृत्तपत्रे मागवत असतात ज्यामध्ये इंग्रजी आणि उर्दू वृत्तपत्रांचा समावेश असतो. आता त्यांच्या बुक स्टॉलवर मिळणाऱ्या पाकिस्तानी वृत्तपत्रांची, मासिकांची आणि साप्ताहिकांची किंमत वाढली आहे. पाकिझा, खवातीन अँड शुआ या मासिकांची किंमत १०० वरून २०० रुपयांवर गेली आहे. तर डेलि जंग, नया वक्त, डॉन आणि जसरत यांसारखी वृत्तपत्रं ३० रुपयांपासून ५० रुपयांना विकली जात आहेत. यामागे आसिफ यांना ५ ते १० रुपयांचा फायदा होतो. आसिफ हे सध्या प्रत्येक वृत्तपत्राच्या फक्त १० प्रति मागवत आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नाझ बुक डेपोमध्ये पाकिस्तानी वृत्तपत्रांचा तुटवडा जाणवतो आहे.