पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला दहशतवादी याची हमजा बुरहान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता हमजाला पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे दफन करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार, हमजा बुरहानची हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली आहे.

हमजा बुरहानचा अंत्यविधी

हिजबुल मुजाहिदीन आणि अल बद्र यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित मोठ्या संख्येने लोक त्याच्या अंत्यविधीला उपस्थित होते, असे म्हटले जाते. या व्हिडिओमुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कबद्दल नव्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुझफ्फराबाद हे शहर नसून अनेक दहशतवादी संघटनांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे, असे मानले जाते. हमजा एका शाळेचा मुख्याध्यापक होता, असा पाकिस्तानचा दावा आहे. पण, समोर आलेल्या व्हिडिओंमधून एक वेगळेच सत्य उघड झाले आहे.

व्हिडीओ समोर

या व्हिडिओंमध्ये हमजा बुरहान एके-४७ असॉल्ट रायफलसारख्या आधुनिक शस्त्रासह दिसत आहे. तो सशस्त्र लोकांना भेटताना आणि त्यांना मिठी मारताना दिसत आहे, ज्यामुळे त्याचे दहशतवादी संबंध सिद्ध होत असल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हमजाच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वीचा असल्याचे म्हटले जाते. हमजा नेहमी आपल्यासोबत एके-४७ बाळगत असे, कारण त्याला कोणत्याही क्षणी हल्ल्याची भीती होती, असे सांगितले जाते.

आयएसआयची भूमिका

एका अहवालानुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था, आयएसआयने हमजाला शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नियुक्त केले होते. निष्पाप शाळकरी मुलांमध्ये आयएसआयचा प्रचार करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती, असा आरोप आहे. हमजा बुरहानच्या अंत्यविधीच्या व्हिडिओमुळे आता पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे. या व्हिडीओमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ आणि नेटवर्क अजूनही सक्रिय असल्याच्या चर्चा होत आहेत.