पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानाला जबाबदार धरु नका. जैश-ए-मोहम्मद ही संघटना पाकिस्तानात असली तरी ती काश्मीरमध्येही सक्रिय आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला ही भारतामध्ये स्वदेशात घडलेली घटना आहे. पाकिस्तानचा त्यामध्ये सहभाग नव्हता असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने लगेचच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानात आकाराला आलेली संघटना आहे. भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने जैशची निर्मिती केली आहे. भारतीय सुरक्षा दलांच्या क्रूरतेनंतर काश्मिरी मुलगा कट्टरपंथीय बनला. त्याने हा हल्ला घडवून आणला. पण अचानक पाकिस्तान चर्चेमध्ये आला असे इम्रान म्हणाले.

१४ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेले वाहन सीआरपीएफच्या बसला धडकवण्यात आले. त्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोटमधील जैशच्या तळावर एअर स्ट्राइककरुन या हल्ल्याचा हिशोब चुकता केला. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारताच्या हद्दीत घुसली होती. पण इंडियन एअर फोर्सने त्यांचा डाव उधळून लावला. दोन्ही देशांमध्ये त्यावेळी युद्धाची स्थिती निर्माण झाली होती.

इम्रान खान यांची कबुली
पाकिस्तान ४० विविध दहशतवादी संघटना सक्रिय होत्या हे इम्रान खान यांनी कबूल केले आहे. आम्ही दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची लढाई लढत आहोत. ९/११ शी आमचे काही देणेघेणे नाही. अल कायदा अफगाणिस्तानात होती. पाकिस्तानात तालिबानचे दहशतवादी नव्हते. पण आम्ही अमेरिकेच्या लढाईत सहभागी झालो. दुर्देवाने जेव्हा काही गोष्टी चुकीच्या घडल्या तेव्हा मी माझ्या सरकारला दोष दिला. आम्ही जमिनीवरील खरी सत्य परिस्थिती अमेरिकेला सांगितली नाही असे इम्रान म्हणाले.