पीटीआय, नवी दिल्ली

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या आणखी दोन रेल्वेगाड्या मंगळवारपासून सुरू केल्या जात आहेत. पुणे-बनारस आणि मुंबई-अयोध्या या दोन नव्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या दोन्ही गाड्या आठवड्यातून एकदा धावतील. पुणे-बनारस ही गाडी हडपसरमधून तर मुंबई-अयोध्या ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. यामुळे काशी विश्वनाथ धाम आणि श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्राचे दर्शन सुलभ होईल, असे रेल्वे मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या पुणे-बनारस अमृत भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-अयोध्या अमृत भारत एक्स्प्रेसमुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रादरम्यान प्रवास करणारे प्रवासी, स्थलांतरित कर्मचारी आणि यात्रेकरूंना फायदा होईल, असे रेल्वे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे बदलण्याची गरज पडणार नाही, याद्वारे प्रवाशांना परवडणाऱ्या दरामध्ये आरामदायक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

पुणे-बनारस या ३० तास अंतराच्या मार्गावर प्रयागराज, झाशी, भोपाळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर इत्यादी १८ महत्त्वाची स्थानके असतील. तर तर मुंबई-अयोध्या हा प्रवास सुमारे २८ तासांचा असेल आणि त्यादरम्यान ही रेल्वेगाडी सुल्तानपूर, प्रयागराज, सतना, जबलपूर, भुसावळ, नाशिक रोड इत्यादी १२ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.