पुण्यात पोर्श ही कोट्यवधी किंमतीची कार बेदरकारपणे चालवत अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना जोरदार धडक दिली. या धडकेत अश्विनी आणि अनिश दोघांचाही मृत्यू झाला. रविवारी ही घटना घडली आहे. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. अनिश आणि अश्विनी या दोघांची काहीही चूक नसताना फक्त एका विख्यात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवत त्या दोघांना धडक दिली. ज्यामध्ये त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले. यानंतर आता अश्विनीच्या वडिलांची मन सून्न करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी काय घटना घडली?

मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत या मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. तर अश्विनीच्या वडिलांनीही मन सून्न होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा-Pune Porsche Accident: अनिशच्या पालकांचा आरोप “महाराष्ट्र पोलिस आणि रुग्णालय प्रशासानाने आम्हाला..”

अनिश आणि अश्विनीचा मित्र अकिबने काय सांगितलं?

अनिश आणि अश्विनी यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी अनेक दिवस एकत्र भेट झाली नसल्याने डिनर प्लान केला आणि पबमध्ये जायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणी नगर भागात रेस्तराँ होतं. आम्ही तिथेच गेलो. पुढे काय घडणार आहे ते आम्हाला माहीतही नव्हतं. आम्ही सगळे घरी परतण्यासाठी बाहेर पडलो तितक्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हा भीषण अपघात झाला. अनीश आणि अश्विनी यांचा मित्र अकीब मुल्लाने सांगितलं. माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही असंही अकीबने स्पष्ट केलं

हे पण वाचा- Pune Porsche Accident:दोन निष्पाप जीव घेणाऱ्या पोर्शचा वेग किती होता? पंचनाम्यात समोर आलं वास्तव

अश्विनीच्या वडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया

“भारतीय संविधानात कायद्याची तरतूद आहे. त्या तरतुदीनुसारच दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे. किमान यापुढे तरी अशा घटना घडू नयेत आणि पालकांना आपली मुलं गमवावी लागू नयेत असं वाटतं. आम्हीही आमच्या मुलांना सज्ञान झाल्याशिवाय गाडी चालवायला दिली नव्हती. जे काही घडलं आहे ते साफ चुकीचं आहे. गाडी चालवता तर आली पाहिजे ना? म्हणजे असं घडलं नसतं. माझ्या मुलीचं शिक्षण पुण्यात झालं. ती नोकरीही तिथेच करत होती. आता एका अपघातात तिचा मृत्यू झाला आहे. आमची सगळी स्वप्नं हरवली आहेत त्यांचा चुराडा झाला आहे.” अशी उद्विग्न प्रतिक्रिया अश्विनीचे वडील सुरेश कोस्टा यांनी दिली आहे. मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्यांचा कंठ दाटून आला होता.

अश्विनी कोस्टाच्या आईची काय प्रतिक्रिया?

अश्विनीची आई ममता म्हणाल्या, “माझी लेक आमच्यासाठी एक उमलणारा गुलाब होती. आम्ही तिला निरोपही देऊ शकलो नाही. हा अपघात इतका क्रूर होता की तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. तिच्यावर आम्ही योग्य अंत्यसंस्कारही करू शकलो नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune car accident case suresh koshta father of ashwini koshta who was killed in the accident says as per rules action should be taken scj
First published on: 22-05-2024 at 08:26 IST