Goa-Pune Flight Window Video: अहमदाबाद विमान अपघातानंतर अलिकडच्या काळात विमान वाहतुकीत येणाऱ्या व्यत्ययाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे विमान प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशात अशीच आणखी एक घटना गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या विमानात घडली आहे. हे विमान हवेत असतानाच त्याच्या खिडकीची फ्रेम निखळल्याची घटना १ जुलै रोजी घडली.
दरम्यान, या प्रकरणी एअरलाइनला प्रश्न विचारताना एका प्रवाशाने हा मुद्दा उपस्थित करणारा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. या प्रवाशाने खिडकीच्या निखळलेल्या फ्रेमचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “हे विमान हवेत उड्डाण करण्यासाठी योग्य आहे का?”
१ जुलै रोजी गोव्याहून पुण्याला जाणाऱ्या विमानात ही भयानक घटना घडली. विमान पुण्यात उतरल्यानंतर, देखभाल प्रक्रियेनुसार या विमानाच्या खिडकीची फ्रेम दुरुस्त करण्यात आल्याची माहिती स्पाइसजेटने एका निवेदनात दिली आहे.
विमानातील प्रवासी मंदार सावंत यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “मी एका कार्यक्रमात सहभागी होऊन गोव्याहून पुण्याला परतत होतो. माझ्या मागे एक महिला बसली होती आणि तिच्याबरोबर एक बाळही होते. उड्डाणानंतर अर्धा तास उलटल्यानंतर तिच्या जवळची खिडकी अचानक निखळली. यामुळे ती महिला प्रचंड घाबरली होती.”
ते पुढे म्हणाले की, “विमान परिचारिकांनी आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला, याशिवाय त्या आणखी काय करू शकल्या असत्या? त्यांनी त्या महिलेला आणि तिच्या बाळाला मागे वेगळ्या सीटवर बसवले. विमान परिचारिका खिडकी बसवण्यात यशस्वी झाली, परंतु अचानक आणखी कोणती हालचाल झाली असती तर ती पुन्हा पडली असती.”
१ जुलै रोजी संध्याकाळी ५.२० वाजता नियोजित असलेले हे विमान दीड तास उशिराने ६.५५ वाजता निघाले. “आम्हाला विमानतळावर कळले की ‘तांत्रिक समस्यांमुळे’ आदल्या दिवशीही विमान उशिरा निघाले होते,” असे मंदार सावंत म्हणाले. याचबरोबर त्यांना विमान कंपनीकडून उड्डाण उशिरा होणार असल्याची कोणतीही माहिती किंवा मेसेज मिळाला नव्हता.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्पाइसजेटच्या क्यू४०० विमानातील एका कॉस्मेटिक विंडो फ्रेम उड्डाणादरम्यान सैल झाली आणि ती निखळली. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा एक नॉन-स्ट्रक्चरल ट्रिम घटक होता, जो सावलीसाठी खिडकीवर बसवण्यात आला होता. त्यामुळे विमानाची सुरक्षितता कोणत्याही प्रकारे धोक्यात आली नाही. संपूर्ण उड्डाणादरम्यान केबिन प्रेशरायझेशन सामान्य होते आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम झाला नाही.”