Pune IIT Admission Scam Racket: देशातील नामांकित IIT मध्ये प्रवेश मिळवण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न एका तरुणाला गुन्हेगारीच्या वाटेवर घेऊन गेले. आयआयटीचे स्वप्न दाखवून नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला मुंबई पोलिसांनी जेरबंद केले आहे. या रॅकेटचा म्होरक्या पुण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेला युवराज कुमार शर्मा उर्फ सोनू कुमार (३५) असून, त्याच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.

पवईतील तक्रारीवरून गुन्ह्याचा उलगडा

पवईतील एका महिलेने आपल्या मुलाला IIIT हैदराबादमधील प्रवेशासाठी इन्स्टाग्रामवरील ‘echorbit1111’ या खात्याद्वारे संपर्क साधला होता. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली या महिलेकडून १६ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले. मात्र प्रवेश न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत बँक खात्यातील १६ लाख रुपये गोठवले व न्यायालयाच्या आदेशानंतर ते तक्रारदाराला परत मिळवून दिले.

सोशल मीडिया ते बोगस कॉल सेंटर

या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत पोलीस पुण्यात पोहोचले. पोलिसांनी विमान नगर, लोहगाव आणि खराडी येथील दोन भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकला असता तेथे बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे उघडकीस आले. हे रॅकेट मार्च ते जुलै या प्रवेश प्रक्रियेच्या काळात अत्यंत नियोजनबद्धरीत्या चालवले जात होते.

अशी होती गुन्ह्याची पद्धत

आरोपी बोगस सिम कार्डच्या आधारे सोशल मीडियावर जाहिराती चालवत प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या पालकांची माहिती मिळवत. पालकांचा विश्वास संपादन करण्यासाठी महाविद्यालयांच्या आवाराबाहेर भेटीगाठी घेतल्या जात. टोळीतील एक सदस्य महाविद्यालयाचा प्रशासकीय अधिकारी असल्याचे भासवत होते. प्रवेश यादी जाहीर होण्यापूर्वीच हे कॉल सेंटर बंद केले जायचे आणि वापरलेले फोन व सिम कार्ड नष्ट करून आरोपी फरार होत असत.

pune-iit-admission-scam-racket-busted
पोलिसांनी मुद्देमालासह या टोळीला जेरबंद केले आहे. (Express photo)

आलिशान गाड्यांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून बीएमडब्ल्यू आणि इतर आलिशान गाड्यांसह २२ मोबाईल फोन, २३ सिम कार्ड, लॅपटॉप आणि हार्ड डिस्क असा सुमारे १ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय बँक खात्यांमधील २४ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत.

आरोपींमध्ये अभियंते आणि विद्यार्थ्यांचा समावेश

तपासात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी युवराज शर्माने या कामासाठी नोएडामधील नामांकित महाविद्यालयांतील इंजिनिअरिंग आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशिप’ आणि अनुभवाच्या प्रमाणपत्राचे आमिष दाखवून कामावर ठेवले होते.

अटक केलेल्या आरोपींमध्ये लखनौचा देवेंद्र सिंह (२७), गाझीपूरचा सौरभ सिंह (२६), जमशेदपूरचा दीपेंद्र प्रजापती (२८), नोएडामधून एमबीए करणारा शुभम शर्मा (२४), सौरभ रवींद्र कुमार (२१) यांच्यासह तुषार सैनी, सात्विक सिंह आणि प्रांजल सिंह या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच टोळीला बोगस सिम कार्ड पुरवणारा अंधेरी येथील विक्रेता अबू इश्तियाक सैफ (२१) यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.