शबरीमला मंदीर प्रवेशावरून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी महिलाविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहराची ग्रामदेवता तांबडी जोगेशवरी मंदिरा बाहेर निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण आणि शहर अध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की,महिलांविषयी भाजपच्या अनेक मंत्री आणि पदाधिकायाकडून बेताल वक्तव्य केली जात आहे.त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही.ही निषेधार्थ बाब असून स्मृती इराणी यांनी राजीनामा न दिल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

काय म्हणाल्या होत्या स्मृती इराणी – 
रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे. देवाच्या मंदिरात जाणं आणि तिथे जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र मासिक पाळी आल्यानंतर त्या अवस्थेत तुम्ही देवाच्या मंदिरात कशा काय जाऊ शकाल असा प्रश्न स्मृती इराणींनी विचारला आहे. तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकत नाही तर मग देवाच्या मंदिरात तुम्ही जाताना त्या अवस्थेत कशा काय जाल? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे.
महिलांना मासिक पाळी येते ही अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे. अशा अवस्थेत तुम्ही मंदिरात जाण्याचा हट्ट आणि प्रार्थना करण्याचा हक्क कसा काय बजावू शकता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे असेही इराणी यांनी म्हटले आहे. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनतर्फे एक परिषद आयोजित करण्यात आली होती त्या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी त्यांचे मत मांडले आहे. सुप्रीम कोर्टाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे मी एक केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही पण माझे व्यक्तीगत मत मी इथे व्यक्त केले आहे.