पुणे पोर्श अपघात प्रकरणात तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली आदित्य अविनाश सूद, आशिष सतीश मित्तल आणि अमर संतोष गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली होती. अपघातावेळी कारमध्ये असलेल्या आणि त्यावेळी अल्पवयीन असलेल्या आरोपींच्या रक्ताचे नमुने स्वतःच्या रक्ताच्या नमुन्यांशी बदलल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठीने याचिकाकर्ते तीन वर्षांहून अधिक काळ अंडरट्रायल कोठडीत असताना या प्रकरणात साक्षीदारांची संख्या वाढवण्यात काही अर्थ नाही असे म्हटले आहे. या प्रकरणात अद्याप १५९ साक्षीदारांची चौकशी होणे बाकी आहे.

सूद आणि मित्तल यांना गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आले होते. या दोघांच्या रक्ताचे नमुने अपघातावेळी कारमध्ये उपस्थित असलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुन्यांऐवजी तपासणीसाठी तसेच त्यांची अदलाबदल करण्यासाठी वापरण्यात आल्यानंतर ही अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सूद आणि मित्तल यांच्यासह इतर सहा जणांची याचिका गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात फेटाळून लावली होती.

प्रकरणात नेमकं काय झालं?

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री हा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला होता. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळात हजर केले. बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे अशा अटी, शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला. अपघातानंतर पंधरा तासात मुलाची मुक्तता करण्यात आल्याने सामान्यांनी संताप व्यक्त केला. देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी बाल न्याय मंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर बाल न्याय मंडळाने मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.

अपघातानंतर मुलाला वाचविण्यासाठी वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र यांनी प्रयत्न केले. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना अल्पवयीन मुलाने केलेला गु्न्हा अंगावर घेण्यासाठी धमकावले. ससून रुग्णालयात मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानीने स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपये पैसे देेण्यात आले. अगरवाल यांचा परिचित अश्फाक इनामदार, अमर गायकवाड यांच्यामार्फत बाल न्याय मंडळाच्या आवारात घटकांबळेला पैसे देण्यात आले होते.

अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत मोटारीत त्याचे दोन मित्र होते. ससून रुग्णालयात त्यांच्याही रक्ताचे नमुने घेण्यात आले. डाॅ. तावरे याच्या सांगण्यानुसार, डॉ. हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरला वैद्यकीय कक्षात बोलावून घेतले. तेथे अल्पवयीन मुलाऐवजी अन्य दोन मुलांचे रक्ताचे नमुने घेतले, अशी माहिती तपासात मिळाली होती.