West Bengal Youth Murder In Pune: पुण्यात पश्चिम बंगालमधील स्थलांतरित कामगाराची हत्या झाली आहे. भाषेवरुन तरुणाला टार्गेट करत खून केल्याचा दावा करण्यात येत आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ‘भाषेवरुन तरुणाचा छळ करुन हत्या करण्यात आली हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे’, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

मूळ बंगालमधील तरुण

सुखेन महातो (२४, रा. बंदवान, पुरुलीया पश्चिम बंगाल) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यात काम करत होता. ममता बॅनर्जी यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुखेन त्यांच्या घरातील एकमेव कमवता व्यक्ती होता.

ममता बॅनर्जी यांच्याकडून संताप व्यक्त

“सुखेन महातो यांच्या हत्येच्या घटनेने मी हादरली आहे, संतापले आहे. हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे. एका तरुणाचा त्याची भाषा, ओळख, मूळ यासाठी छळ करुन हत्या करण्यात आली. परप्रांतीयद्रोह याचा शस्त्र म्हणून वापर करत निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे”, असे ममता यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाईची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

दोषींना अटक करुन कारवाईची मागणी

या घटनेतील दोषींना अटक करुन त्यांच्यावर कठोर करवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. महातो यांच्या कुटुंबीयांसोबत बंगाल सरकार खंबीरपणे उभं असल्याचे ममता यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे.