डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशन (DNPA) ने ‘टाइम्स इंटरनेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) पुनीत गुप्त यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ‘मनोरमा ऑनलाइन’च्या सीईओ मरियम ममेन मॅथ्यू यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता पुनीत गुप्त ही जबाबदारी स्वीकारतील. याचसोबत ‘द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय, एबीपी ग्रुपचे सीईओ ध्रुव मुखर्जी यांचं खजिनदारपद कायम ठेवण्यात आलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या DNPA बोर्डाच्या बैठकीत या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पुनीत गुप्त हे आत्तापर्यंत संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. ते DNPA च्या महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये आणि उद्योग क्षेत्रातील कार्यात सक्रीयरीत्या सहभागी होते. पदभार स्वीकारल्यानंतर पुनीत गुप्त म्हणाले, “डिजिटल न्यूज पब्लिशर्स सध्या या क्षेत्रातील सर्वात मोठ्या फेरबदलातून जात आहेत. मग ते कंटेन्टचा शोध कसा घेतला जातो इथपासून ते AI युगात त्याचे मूल्य कसे ठरवले जाते इथपर्यंत. अशा महत्त्वाच्या काळात एक सर्वंकष संस्था म्हणून DNPA ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळेच माझं लक्ष या बदलांना फक्त प्रतिसाद देण्यावर नसून त्यासंदर्भातली धोरणं ठरवणे आणि त्याअनुषंगाने या क्षेत्रासाठी योग्य असे औद्योगिक आराखडे तयार करण्यावर केंद्रीत असेल”.
यावेळी उपसंचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अनंत गोएंका यांनीदेखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. “DNPA आणि भारताच्या डिजिटल न्यूज उद्योगासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. सर्व प्रकाशकांनी एकत्र येणे, आपापले दृष्टिकोन इतरांसमोर मांडणे आणि भविष्यातील संधी व आव्हानं समजून घेणे हे या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे”, असं अनंत गोएंका म्हणाले.
DNPA च्या मावळत्या संचालिका मरियम मॅथ्यू यांनीदेखील त्यांच्या कारकिर्दीबाबत यावेळी भावना व्यक्त केल्या. “या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या काळात DNPA चं नेतृत्व करणं माझ्यासाठी गौरवाची बाब होती. मला खात्री आहे की पुनीत गुप्त यांच्या नेतृत्वाखाली DNPA चा प्रभाव आणि कामगिरी यात उत्तरोत्तर प्रगतीच होत राहील. मी नव्या नेतृत्वाला शुभेच्छा देते”, असं त्या म्हणाल्या.
DNPA च्या सरचिटणीस आणि सीईओ सुजाता गुप्ता यांनी यावेळी संघटनेच्या कार्यक्षेत्रात नवा अध्याय सुरू होत असल्याचं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, “संघटनेच्या नेतृत्वात झालेला बदल ही एक नवी सुरुवात आहे. आमच्या सदस्यांसाठीच्या सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण योगदान देता यावं यासाठी परस्पर विश्वासाचं नातं आणि वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न केले आहेत. पुनीत गुप्त आणि अनंत गोएंका यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे काम पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी सज्ज आहोत. यात धोरणे, न्याय्य व्यावसायिक प्रणाली आणि डिजिटल न्यूज पब्लिशर्स देशाच्या माहिती विश्वातील आपलं महत्त्व टिकवून ठेवू शकतील यासाठीच्या प्रयत्नांचा समावेश असेल”.
