पीटीआय, चंदीगड
पंजाबमध्ये ‘आप’ सरकारचा विश्वासदर्शक ठराव शुक्रवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. नुकतेच आपच्या सात राज्यसभा सदस्यांच्या गटाचे भाजपत विलिन झाल्यानंतर हा ठराव मंजूर झाला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला.यावेळी बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले, आम आदमी पक्ष संपणार आहे, पक्षाचे आमदार पक्ष सोडतील अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भ्रम निर्माण होत आहे, असे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात अनुपस्थित असताना हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला तर भाजपने अधिवेशनावर बहिष्कार टाकला. शिरोमणी अकाली दल आणि बसपचे आमदारही उपस्थित नव्हते.
ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री मान म्हणाले, पक्ष मजबूत आहे आणि विस्तारत आहे. जम्मू-काश्मीरपासून गोव्यापर्यंत आमच्या पक्षाचे अस्तित्व आहे. डोडामध्ये आमचा आमदार आहे. पंजाबमध्ये आमचे सरकार यशस्वीपणे चालू आहे. दिल्लीत आम्ही विरोधात आहोत. गुजरातमध्ये पाच आणि गोव्यात दोन आमदार आहेत. ते पुढे म्हणाले, कठोर परिश्रमाने पक्ष उभा केला आहे. आम्ही पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर खंबीरपणे उभे आहोत. या विश्वासदर्शक ठरावाला अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी अनुमोदन दिले.
पक्षीय बलाबल
पंजाबच्या ११७ सदस्यीय विधानसभेत आपकडे ९४ आमदारांचे स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसकडे १६, शिरोमणी अकाली दलाचे तीन, भाजपचे दोन, बसपचा एक आणि एक अपक्ष आमदार आहे.
