पंजाबचे महाधिवक्ता एपीऐस देओल यांनी शनिवारी काँग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध दंड थोपटले. आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सिद्धू हे चुकीची माहिती पसरवीत आहेत, शिवाय राज्य सरकार आणि महाधिवक्त्यांच्या कामात अडथळे आणत आहेत, असा आरोप देओल यांनी केला.

सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो त्यांनी आता मागे घेतला आहे, पण राज्य सरकारने पोलीस महासंचालक साहोटा आणि महाधिवक्ता देओल यांच्या जागी अन्य व्यक्तींची नियुक्ती केली, तरच आपण प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारू, असे त्यांनी शुक्रवारी म्हटले होते. त्यावर देओल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देओल यांनी २०१५ मधील धर्मग्रंथ अवमान आणि गोळीबार प्रकरणातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे वकीलपत्र घेतले होते, असा आरोप सिद्धू यांनी केला आहे.

देओल यांनी म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता काही हितसंबंधी लोक काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यातील घटनात्मक पद असलेल्या महाधिवक्त्यांच्या कार्यालयास बदनाम करण्यामागे त्या लोकांचा राजकीय स्वार्थ आहे. अंमली पदार्थांचे प्रकरण असो की धार्मिक अवमानाचे, त्यात योग्य तो न्याय करण्याचा प्रयत्न सरकार करीत असून त्यात खीळ घालण्याचे काम काँग्रेसचा हा नेता सतत आरोप करून करीत आहे.

देओल यांनी सिद्धू यांच्यावर उघड टीका केल्याने आता सिद्धू आणि पंजाबमधील चरणजितसिंग चन्नी सरकारमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री चन्नी हे सिद्धू यांचा दबाव जुमानण्यास तयार नसल्याचे मानले जाते. 

भाजपची राज्यपालांकडे हस्तक्षेपाची मागणी

पीटीआय, नवी दिल्ली

पंजाबमधील शासन कोलमडून पडण्यास काँग्रेस पक्ष कारणीभूत ठरत असून आता यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे भाजपचे नेते तरुण चूघ यांनी म्हटले आहे. चूघ यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादांमुळे राज्यातील शासकीय यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडली आहे. पंजाबचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर ते शासकीय कामात ढवळाढवळ करीत असल्याची टीका केली आहे. यातून आधीच अमली पदार्थ, वाळू आणि दारू माफियांच्या नियंत्रणाखाली गेलेले हे राज्य कडेलोटाच्या उंबरठ्यावर आणले गेल्याचा आरोप चूघ यांनी केला आहे. सिद्धू यांच्या वर्तनामुळे राज्याच्या घटनात्मक चौकटीला धक्का बसत असून यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, असे त्यांनी म्हटले आहे. धार्मिक अवमान प्रकरणात काँग्रेस दोषींना शिक्षा करण्याऐवजी केवळ राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.