Punjab Assembly Bhagwant Mann: विरोधकांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांची मद्य चाचणी करण्याची मागणी केल्यानंतर पंजाब विधानसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या हौदात धाव घेत गोंधळ घातला. दुपारच्या जेवणानंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू तेव्हा काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री मान यांची अल्कोमीटरद्वारे चाचणी करण्याची मागणी केली. यानंतर आपच्या आमदारांनी घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांची मद्य चाचणी करण्याची मागणी

काँग्रेस अमदाराने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह सभागृहातील सर्व आमदारांची अल्कोमीटरद्वारे मद्य चाचणी करण्याची मागणी केली. यानंतर सभागृहात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पण, विधानसभेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री आणि आमदारांची तात्काळ मद्य चाचणी करण्याची मागणी फेटाळून लावली. सध्या पंजाब विधानसभेचे विषेश अधिवेशन सुरु आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी मान यांच्या वर्तनाबाबत शंका उपस्थित केली होती. याबाबत बाजवा यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहले आहे.

विरोधी पक्षनेत्याचे अध्यक्षांना पत्र

बाजवा यांनी अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात मान यांच्या वर्तनाबाबच चिंता व्यक्त व्यक्त केली होती. “हा मुद्दा अत्यंत चिंताजनक असून, याकडे दुर्लक्ष केल्यास या प्रतिष्ठित संस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका आहे,” असे मत त्यांनी मांडले होते. “अधिवेशनादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे ज्याबाबत आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी मुद्दा उपस्थित केला त्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. आमदाराने केलेल्या आरोपांना उत्तर न देताच माननीय मुख्यमंत्री सभागृहातून निघून गेले,” असे बाजवा यांनी पत्रात म्हटले आहे.

आपचे स्पष्टीकरण

याप्रकरणी तातडीने लक्ष घालून मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांची मद्य चाचणी करण्याची मागणी बाजवा यांनी केली. दरम्यान विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे आपने खंडन केले आहे. “काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत”, असे आप प्रमुख आणि मंत्री अमन आरोरा यांनी पीटीआयशी बोलतना सांगितले.

खासदार स्वाती मालिवाल यांचे आरोप

नुकतेच आपला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केलेल्या स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर जोरदार टीका केली. “हा माणूस दारू पिऊन गुरुद्वारा साहिबला जातो, दारू पिऊन मंदिरात जातो, दारू पिऊन लोकसभेत यायचा, दारू पिऊन सरकारी बैठकांना जायचा आणि परदेशात इतकी दारू प्यायचा की त्याला विमानातून उतरवावे लागले,” असा आरोप मालीवाल यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून केला आहे.

अकाली दलाकडून टीका

शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल यांनीही मान यांच्यावर टीका केली आणि सभागृहातील त्यांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “लोकशाहीच्या मंदिरात हा शिष्टाचाराचा भंग आहे. पंजाबच्या जनतेने त्यांना निवडून दिले आहे, त्यांचा हा घोर अपमान आहे,” अशी टीका बादल यांनी केली. दरम्यान, या घटनेमुळे विधानसभेत जोरदार गदारोळ झाला असून, देशाच्या राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.