पंजाब विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजप आमदार अश्वनी शर्मा यांच्या एका वक्तव्यावरून खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार पंजाबला निधी देत नसल्याचा सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तर देताना शर्मा यांनी, “जर मुलगा जन्माला आला, तर तुम्ही म्हणता की ते तुमच्या कष्टाचे फळ आहे, पण जर मुलगी जन्माला आली, तर तुम्ही केंद्राला दोष देता,” अशी टिप्पणी केली. या वक्तव्यावर महिला आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत माफीची मागणी केली.

सरकारला सवाल

लक्षवेधी प्रस्तावांवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी सुरुवातीलाच, “मी माफी मागून हे सांगतो,” असे म्हणत वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. “राज्यातील बेकायदेशीर उत्खननाची सद्यस्थिती काय आहे? ‘ज्याचं शेत, त्याची रेत’ या तुमच्या योजनेचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. बेकायदेशीर उत्खननाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना गप्प करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जाते,” असे त्यांनी सभागृहात सांगितले.

महिला आमदारांचा संताप, माफीची मागणी

शर्मा यांच्या वक्तव्यावर महिला आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हे महिलांचा अपमान करणारे वक्तव्य असल्याचे सांगत त्यांना माफी मागण्याची मागणी केली. काही सदस्यांनी त्यांनी कान धरून माफी मागावी, अशीही मागणी केली.

शर्मा यांचे स्पष्टीकरण

संस्कृत श्लोकांचा संदर्भ देत, अश्वनी शर्मा यांनी नंतर स्पष्ट केले की मुलींबद्दलचा त्यांचा उल्लेख हा केवळ एक नेहमी वापरला जाणारा वाक्प्रचार होता आणि महिलांविषयी आपल्याला अत्यंत आदर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपले विधान विधानसभेच्या कामकाजाच्या नोंदीतून वगळण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आम आदमी पार्टीकडून भाजपवर टीका

आम आदमी पार्टीचे आमदार सरवजीत कौर मनुके यांनी शर्मा यांचे वक्तव्य भाजपच्या महिलांविषयीच्या प्रतिगामी आणि भेदभावपूर्ण मानसिकतेचे प्रतीक असल्याची टीका केली.

कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांनीही शर्मा यांच्यावर टीका केली. “आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. तुमचेच पंतप्रधान ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देतात, आणि तुम्ही मात्र मुलींविषयी चुकीची टिप्पणी करता,” असे म्हणत त्यांनी प्रत्येक मुलीची माफी मागण्याची मागणी केली.

वादाची पार्श्वभूमी

हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा पंजाबचे खाण व भूविज्ञान मंत्री बरिंदर गोयल यांनी केंद्र सरकारवर पंजाबचा निधी रोखल्याचा आरोप केला. केंद्राने सहकार्य केले असते तर राज्याला वाळू उत्खननातून २० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, असा दावा त्यांनी केला.

यावर प्रत्युत्तर देताना शर्मा यांनी पंजाब सरकारकडून महिलांशी केल्या जाणाऱ्या वागणुकीवरून आम आदमी पार्टीच्या आमदारांना जाब विचारला. “महिलांवर लाठीचार्ज होतो तेव्हा त्यांच्यासाठी चिंता कुठे जाते? मग त्या वाल्मिकी समाजातील महिला असोत, शिक्षिका, परिचारिका, ७ फेब्रुवारी रोजी भटिंडा येथील महिला शेतकरी असोत किंवा १५ जुलै रोजी मनरेगा अंतर्गत आंदोलन करणाऱ्या महिला असोत, या सर्वांच्या बाबतीत ते गप्पच राहतात,” असे शर्मा यांनी सभागृहात सांगितले.

नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, “आमच्या मनात महिलांबद्दल आदर आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीरपणे खेद व्यक्त केला आहे, परंतु महिलांच्या नावावर राजकारण केले जाऊ नये,” असे ते म्हणाले.