Bhagwant Mann AI Video: मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कानशिलात लगावली जात असल्याचा एआय व्हिडीओ पंजाब भाजपाने समाज माध्यमांवरुन अखेर हटवला आहे. भाजपाने व्हिडीओची पोस्ट केल्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला व चौफेर टीका होऊ लागल्यानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला. पंजाब भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.
राजकीय वातावरण तापले
पंजाबमध्ये २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. आप सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. यातच भाजपाकडून एक वादग्रस्त एआय व्हिडीओ शेअर करण्यात आला. या एआय व्हिडीओत मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कानशिलात लगावली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. पंजाब भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडीओवरुन राजकीय वादंग झाल्यानंतर भाजपाने हा व्हिडीओ हटवला आहे.
भाजपाने काय स्पष्टीकरण दिले?
पंजाब भाजपाचे अध्यक्ष केवल सिंग ढिल्लून यांनी या वादग्रस्त व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्यांना तो व्हिडीओ पाहिला नसल्याचे स्पष्ट केले. “मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. मला त्यांचा खूप आदर आहे. असा कोणताही व्हिडीओ असेल, तर मी त्याचा निषेध करतो,” असे ढिल्लोन यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.
काँग्रेसकडून टीका
काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी एआय व्हिडीओंच्या वापराच्या मुद्द्यावर टीका केली. “विरोधकांनी राजकीय सभ्यता पाळली पाहिजे”, असेही चन्नी यांनी म्हटले आहे. “जे लोक असे एआय व्हिडीओ बनवत आणि अपलोड करत आहेत, ते चुकीचे आहे. आम्ही याला विरोध करू आणि प्रत्येकाने मर्यादेत राहिले पाहिजे,” असे चन्नी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी काय म्हणाले?
दरम्यान, चन्नी यांनी राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर समोर येणाऱ्या व्हिडीओंवरून मान सरकारवर उपरोधिक टीका केली. “एखादा खरा व्हिडीओ समोर आला आणि तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवून नंतर तो बनावट असल्याचे घोषित केले जात असेल, तर त्यालाही आपला विरोध असेल”, असे चन्नी म्हणाले.
