पंजाबमधील भारतीय जनता पार्टीचे नेते भुपेश अग्रवाल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्यावर पतियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे शेतकरी आंदोलकांनी हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजेच अग्रवाल यांनी या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा आरोपही केलाय.

“५०० शेतकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी डीएसपी तिवाना (पोलीस उप-अधीक्षक) तेथे उपस्थित होते. त्यांनी मला मुद्दाम चुकीच्या दिशेने पाठवलं. माझ्यासोबत पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली नाही. माझ्या जीवाला धोका आहे. मी अनेकदा येथील एसएसपींना (वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना) फोन केला मात्र त्या फोन कॉल्सला उत्तर देण्यात आलं नाही. आमच्या मागण्यांकडे डीएसपीने फारसे लक्ष दिलं नाही. त्यांनी मुद्दाम हे केलं,” असा आरोप अग्रवाल यांनी केलाय.

मात्र डीसीपी तिवाना यांनी हे आरोप फेटाळून लावत अग्रवाल आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आल्याचं म्हटलं आहे. “सर्व आरोप खोटे आहेत. १०० पोलीस कर्मचारी आणि स्टेशन ऑफिसर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. शेतकरी भाजपा नेत्याच्या घराबाहेर आंदोलन करत होते आणि भाजपा नेत्यांचा कार्यक्रम कार्यालयामध्ये सुरु होता. त्यांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांच्या गाड्यांपर्यंत नेलं. त्यानंतर त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेरलं असेल पण आमच्यासमोर असा कोणताच प्रकार घडला नाही,” असं डीएसपींनी स्पष्ट केलं आहे.

पोलीस अग्रवाल यांच्याभोवती सुरक्षा कडं बनवून त्यांना गर्दीमधून बाहेर काढत असतानाही शेतकऱ्यांनी दगडफेक केली.

हरयाणामध्येही राज्याच्या विधानसभेचे उपसभापती रणबीर गांगवा यांच्या गाडीवर आंदोलक शेतकऱ्यांनी हल्ला केला. सिरसा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत असून त्यापैकी एका जागी हा हल्ला करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी भाजपाच्या नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. गांगवा यांच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांनी दगडफेक केली. शेतकरी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये गांगवा यांच्या गाडीच्या मागची काच फुटली आहे. मात्र या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही.