Breaking Punjab Blast News updates : पंजाब दुहेरी स्फोटाने हादरले आहे. दोन वेगवेगळ्या स्फोटांसारख्या घटना मंगळवारी काही तासांच्या फरकाने घडल्या असल्याने पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. स्फोटांची माहिती मिळताच पोलीस आणि लष्करी जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
जालंधरमध्ये स्फोट
जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर पार्क केलेल्या एका स्कूटरला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. तसंच अनेक स्थानिकांनी मोठा स्फोटासारखा आवाज ऐकल्याचा दावा केला आहे. स्फोटाच्या व्हिडिओंमध्ये एक मोठा स्फोट दिसत असून स्फोटाच्या धक्क्याने जवळच उभा असलेला एक मागणून घाबरून पळून जाताना दिसतोय. मात्र, हा स्फोट होता की अपघात हे आताच सांगणं कठीण असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
जालंधर पोलीस आयुक्त धनप्रीत कौर म्हणल्या की, प्राथमिक दृष्ट्या पार्क केलेल्या स्कूटरला आग लागली असली तरीही सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. स्कूटरचा मालक २२ वर्षीय गुरप्रीत सिंग किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, तो गाडीपासून नुकताच बाजूला झाला होता. तेव्हाच गाडीचा अचानक स्फोट झाला आणि त्याला संशय आहे की गाडीवर कोणीतरी वस्तू फेकली असावी.
थोड्याचवेळाने अमृतसरमध्येही स्फोट
तर, रात्री १०. ५० वाजता अमृतसरजवळील खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळ जोरदार स्फोटाचा आवाज आला. हा परिसर अटारी वाघा सीमेपासून अवघ्या १५ किमी अंतरावर आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ग्रेनेड फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमृतसरचे एसपी आदित्य एस. वॉरियर यांनी सांगितलं की, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी बॉम्ब निकामी पथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेची पथके तैनात करण्यात आली आहेत. किती स्फोट झाले आणि त्याचे नेमके कारण काय होते, याची आम्ही पडताळणी करत आहोत, असं ते म्हणाले. तसंच, सविस्तर विश्लेषणासाठी नमुने पाठवण्यात आले असल्याचंही सांगण्यात आलं असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फॉरेन्सिक पथके, बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकांसह सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे आणि परिसर सील करण्यात आलाय. तसंच, संबंधित तरुण तापासात मदत करत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
