Punjab Twin Blasts CM Bhagwant Mann Allegations: पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्यालय आणि अमृतसरमधील लष्करी तळाजवळ दोन स्फोट झाले. यावरुन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील दुहेरी स्फोटासाठी मुख्यमंत्री मान यांनी भाजपाला दोषी ठरवले. एवढेच नव्हे तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अशा गोष्टी करत असून, भाजपाला आता अशा घटनांमधून मतं मिळवायची आहेत का? असा सवाल उपस्थित केला.
दुहेरी स्फोट
जालंधर येथील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्यालय आणि अमृतसरमधील लष्करी तळाजवळ दुहेरी स्फोट झाला. या स्फोटात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. स्फोटांच्या या घटनेनंतर संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी या घटनांच्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, या स्फोटांवरुन मुख्यमंत्री मान यांनी भाजपावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
मुख्यमंत्री मान यांचे आरोप
भाजपा जिथं निवडणूक लढणार असते तिथं अशा प्रकारच्या घटना घडत असतात, अशी टीका मुख्यमंत्री मान यांनी केली. मान यांनी भाजपाने अशी कृत्य करु नये असे म्हणत आगामी ही घटना म्हणजे पंजाब निवडणुकीसाठी तयारी भाजपाची तयारी असल्याच्या गंभीर आरोप केला. मान यांनी यावेळी भाजपाच्या एक्सवरील पोस्टचा संदर्भ दिला. बंगालमध्ये भाजपाने यश संपादन केल्यानंतर भाजपा पंजाब या एक्स खात्यावरुन नेक्स्ट पंजाब अशी पोस्ट करण्यात आली होती. याचाच संदर्भ मान यांनी दिला.
पंजाब हादरले
दोन शब्दांच्या या पोस्टवरुन स्पष्टपणे दिसून येते की भाजपाचे पुढचे लक्ष्य पंजाब निवडणूक असल्याचे दिसून येते, असे भगवंत मान म्हणाले. दरम्यान, पंजाबमध्ये जालंधर आणि अमृतसर येथे झालेल्या हल्ल्यांबाबत अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन या घटनांचा तपास करत असल्याचे सांगितले जात आहे. जालंधर येथील सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) मुख्यालयाजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कूटरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर स्कूटरने पेट घेतला. गजबजलेला भाग असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तपास सुरु
यानंतर तासाच्या फरकाने अमृतसरमधील खासा भागात दुसरा स्फोट झाला. लष्करी तळाजवळचा हा स्फोट झाल्याने यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. स्फोट झालेला भाग अटारी-वाघा या पाकिस्तान – भारतमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळून १५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ग्रेनेड फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमृतसरचे एसपी आदित्य एस. वॉरियर यांनी सांगितलं की, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी बॉम्ब निकामी पथक आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेची पथके तैनात करण्यात आली आहेत. किती स्फोट झाले आणि त्याचे नेमके कारण काय होते, याची आम्ही पडताळणी करत आहोत, असं ते म्हणाले. फॉरेन्सिक पथके, बॉम्ब शोधक पथके आणि श्वान पथकांसह सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे आणि परिसर सील करण्यात आला आहे.
