चंडीगड : आपल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी रविवारी ७ नव्या चेहऱ्यांसह १५ मंत्र्यांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला.

रणदीपसिंग नाभा, राजकुमार वर्का, संगत सिंग गिल्झियान, परगत सिंग, अमरिंदर सिंग, राजा वारिंग व गुरकीरत सिंग कोटली हे ७ नवे चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. राणा गुरजित सिंग यांचे २०१८ साली अमरिंदर सिंग मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर पुनरागमन झाले आहे.

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यापूर्वीच्या अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात असलेल्या ब्रह्म महिंद्रा, मनप्रीत सिंग बादल, त्रिप्त राजिंदरसिंग बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंदर सिंग सरकारिया, रझिया सुलताना, विजय इंदर सिंगला आणि भारत भूषण आशु यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह १८ आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाऊ शकते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी दीर्घकाळ चाललेल्या सत्तासंघर्षांनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सुखजिंदरसिंग रंदावा व ओ.पी. सोनी यांना सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

राणा गुरजित सिंग, महिंद्र व सिंगला हे अमरिंदर यांच्या जवळचे मानले जातात.

राणांच्या नावाला विरोध

यापूर्वी, माजी मंत्री राणा गुरजितसिंग हे ‘भ्रष्ट व कलंकित’ असल्याचा आरोप करून काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाविरुद्ध प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांना पत्र लिहिले होते. त्यांच्याऐवजी एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या दलित नेत्याला मंत्रिमंडळात घेतले जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही पाठवली होती.