पंजाबमध्ये एका नवविवाहित दांपत्याला आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी त्यांच्या भेटीसाठी चक्क आपला ताफा थांबवला. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी भटिंडाच्या दौऱ्यावर असताना मंडी कलन गावात त्यांना एक नवविवाहित दांपत्य दिसलं, यावेळी त्यांनी ताफा थांबवला आणि गाडीतून खाली उतरत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. अचानक मुख्यमंत्री आल्याचं पाहून इतरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.


पंजाब सरकारने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भोवती पोलिसांचा ताफा असून नवदांपत्याच्या नातेवाईकांनाही गर्दी केल्याचं दिसत आहे. यावेळी कोणीही मास्क घातलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांना जोडप्याला शुभेच्छा दिल्या, तसंच नातेवाईकांनी दिलेली मिठाईदेखील खाल्ली.

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी मंत्रीमंडळात सहा नवे चेहरे आणले असून आधीच्या सहा मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सामान्य माणसाचा प्रतिनिधी असं म्हणवून घेणाऱ्या चन्नी यांच्या मंत्रीमंडळात सध्या १५ सदस्य आहेत.

शपथ घेतल्यानंतर चन्नी यांनी म्हटलं होतं की, “मी सामान्य माणूस, शेतकरी आणि अन्नायग्रस्तांचा प्रतिनिधी आहे. मी श्रीमंतांचा प्रतिनिधी नाही. वाळू उत्खनन तसंच इतर बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी असणाऱ्यांनी माझ्याकडे येऊ नये, मी तुमचा प्रतिनिधी नाही”.