पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या कौतुकासाठी आणि त्यांचा विजय साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. बुधवारी (८ सप्टेंबर) संध्याकाळी पार पडलेल्या या भोजनाच्या कार्यक्रमाकरिता अमरिंदर सिंग यांनी स्वतः आपल्या खेळाडूंसाठी मटण खारा पिशोरी, लवंग वेलची चिकन, आलू कोरमा, दाल मसरी असे अनेक अनोखे आणि अत्यंत स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. इतकंच नव्हे तर यावेळी त्यांनी सर्व खेळाडूंना स्वतः प्रेमाने जेवण वाढलं. त्यांच्या मोहाली येथील फार्महाऊसवर हा कार्यक्रम झाला. यावेळी कॅप्टन अमरिंदर म्हणाले की, “स्वयंपाक बनवल्यानंतर तो सरळ गरमागरम ताटात वाढणं हे नेहमीच उत्तम ठरतं.”

मुख्यमंत्री सकाळपासून गुंतले स्वयंपाकघरात

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे सकाळी ११ वाजल्यापासून विविध पदार्थांच्या तयारीत गुंतले होते. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व जेवण तयार होतं. त्यावर एक हलका हात फिरवणं आणि सजावटीचं काम बाकी होतं. यावेळी अमरिंदर सिंग यांनी कार्यक्रमातील पाहुण्यांना अर्थात ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना वैयक्तिकरित्या अभिवादन केलं. ते म्हणाले कि, “तुम्हा सर्व खेळाडूंनी देशाला गर्व आणि अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी जे केलं ते त्याच्या तुलनेने काहीच नाही.”

नीरज चोप्राने म्हणाला, उत्कृष्ट!

कॅप्टन अमरिंदर सिंग यावेळी म्हणाले कि, जर तुम्ही असा विचार करत असाल की हा ७९ वर्षीय माणूस इतकं काम करून संध्याकाळपर्यंत दमून गेला असेल, तर तुम्ही माझ्यातील सैनिकाला कमी लेखत आहात. दरम्यान, यावेळी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने देखील या जेवणाचं  कौतुक केलं. हे उत्कृष्ट जेवण असल्याचं नीरज चोप्राने सांगितलं. तर डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौर या कार्यक्रमातील आदरातिथ्य पाहून स्तब्ध झाली. कमलप्रीत कौरने तिच्या पहिल्या ऑलिम्पिक दौऱ्यात कौतुकास्पद कामगिरी करत सहावं स्थान पटकावलं आहे.

कांस्यपदक विजेत्या हॉकी संघातील सदस्यांनीही मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पाहुणचाराचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे, रेस-वॉकर गुरप्रीत सिंग आणि नेमबाज अंगदवीर सिंग बाजवा यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.