Punjab Local Body Election Results AAP Victory: पंजाबमध्ये शुक्रवारी आठ महानगरपालिका, ७५ नगरपालिका आणि २० नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात आम आदमी पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले. राज्यभरातील बहुसंख्या नगरपालिकांमधील प्रभागांमध्ये पक्षाला विजय मिळाला आहे. २०२७ मध्ये पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसला काही महानगरपालिकांमध्ये विजय मिळाला असला तरी त्यांचे यश ‘आप’च्या तुलनेने कमी आहे.
राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि इतर सहा नेत्यांनी अलीकडेच भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे पंजाब भाजपामध्ये काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात होते. राघव चड्ढा आणि इतर नेत्यांनी ‘आप’ सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्ष अडचणीत असताना हा विजय पक्षासाठी मोठा दिलासा ठरला आहे.
पंजाबमधील आठपैकी मोहाली, बरनाला, बटाला, मोगा आणि बठिंडा या पाच महानगरपालिकांमध्ये ‘आप’चा विजय झाला आहे. तर कपूरथलामध्ये काँग्रेसने विजयाची नोंद केली. भाजपाने अबोहरमध्ये विजय मिळवला आहे. तर पठाणकोट मनपामध्ये भाजपा सर्वात मोठा ठरला आहे.
कोणत्या पक्षाला किती ठिकाणी विजय?
एकूण १९७७ प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली. त्यापैकी १९६३ प्रभागांचे निकाल सध्या समोर आले आहेत. ‘आप’ने एकूण ९५४ प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. तर त्याखालोखाल काँग्रेसने ३९०, अपक्षांनी २५१, शिरोमणी अकाली दलाने १९१ आणि भाजपाने १७०, तसेच बहुजन समाज पक्षाने सात जागांवर विजय मिळवला आहे. काही प्रभागांचा निकाल अद्याप लागला नाही.
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘आप’, भाजपा, काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. २६ मे रोजी मतदान पार पडले. यावेळी मतदानाची टक्केवारी ६३.९४ इतकी होती.
काँग्रेसचा अनपेक्षित विजय
आम आदमी पक्षाने राज्यभरात आपले वर्चस्व दाखवून दिले असताना काँग्रेसने कपूरथला महानगरपालिकेत ५० पैकी ३१ प्रभाग जिंकून आणि स्पष्ट बहुमत मिळवून अनपेक्षित विजय मिळवला आहे. तर भाजपानेही अबोहर मनपा ताब्यात घेतली असून पठाणकोटमधील सर्वाधिक प्रभागात विजय मिळवला.
७५ नगरपरिषदांपैकी आम आदमी पक्षाने जवळपास ४५ परिषदा जिंकल्या आहेत. तर सुमारे १० नगरपंचायतीमध्ये त्यांनी सत्ता मिळवली आहे.
दरम्यान आम आदमी पक्षाकडून विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच विरोधी पक्षांनी मात्र सत्ताधारी पक्षावर निवडणुकीदरम्यान शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
