पंजाबमध्ये घडलेल्या प्रकारावरून देशभरातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून या मुद्द्यावरून पंजाब काँग्रेसवर गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. दुसरीकडे देशभर पंतप्रधानांच्या स्वास्थ्यासाठी होम-हवन आणि मंत्रजाप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. पंजाबमधल्या एका प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जीव वाचून आल्याचं काय सांगता?”

पंजाबच्या टांडा भागामध्ये मुख्यमंत्री चन्नी यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत बोलताना चन्नी यांनी पंतप्रधानांचा ताफा अडकल्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. “अरे यार, तुम्हाला कोणताही धोका नव्हता. तुमच्या जवळपास कुणीही आलं नाही. कुठली नारेबाजी नाही झाली. कोणती दगडफेक झाली नाही. कोणतीही गोळी नाही झाडली गेली. मग तुम्ही जीव वाचवून आल्याचं काय सांगत आहात?” असा सवालच चन्नी यांनी केला आहे.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा!

मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्वीट!

दरम्यान, एकीकडे चन्नी यांच्या या विधानावरून वाद सुरू झालेला असताना दुसरीकडे त्यांनी केलेलं ट्वीट देखील चांगलंच चर्चेत आलं आहे. चन्नी यांनी शुक्रवारी रात्री एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबतचा संदेश चन्नी यांनी पोस्ट केला आहे. “जिसे कर्तव्य से ज्यादा जान की फक्र हो, उसे भारत जैसे देश में बडी जिम्मेदारी नहीं लेनी चाहिये – सरदार वल्लभभाई पटेल”, असा संदेश चन्नी यांनी पोस्ट केला आहे.

या ट्वीटमध्ये चन्नी यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि पंजाबमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यातून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab cm charanjit singh channi mocks pm narendra modi in cavalcade stuck pmw
First published on: 08-01-2022 at 09:52 IST