पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला अंतर्गत कलह संपुष्टात आला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस प्रदेशाध्यपदाची माळ नवजोत सिंह सिद्धू यांच्या गळ्यात घातली आणि वादाला पूर्णविराम मिळाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सर्वकाही आलबेल असल्याचं सांगितलं आहे. पंजाबच्या राजकीय मैदानात नवजोत सिंह सिद्धू यांनी महत्त्वपूर्ण डाव खेळत त्यांच्या अंदाजात फटकेबाजी केली. राजकीय व्यासपीठावर नवजोत सिंह सिद्धू हे क्रिकेट आणि फलंदाजी करण्यास विसरले नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोरच त्यांनी षटकार ठोकत भाषणाला सुरुवात केली.

पंजाब काँग्रेस भवनमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पक्षाचे आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना चहापानासाठी बोलावलं होतं. यावेळी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. व्यासपीठावर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि नवजोत सिंह सिद्धू हे बाजूला बसले होते. तसेच चर्चा करताना दिसत होते. काही वेळानंतर नवजोत सिंह सिद्धू यांना भाषण करण्यासाठी बोलवण्यात आलं. तेव्हा सिद्धू यांनी पहिल्यांदा हात चोळले आणि उभे राहिले. यावेळी सिद्धू यांना पंजाबचा ‘बब्बर शेर’ अशी उपाधी देण्यात आली. तेव्हा सिद्धू यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि आपला आवडता शॉट खेळला.

दोन्ही नेत्यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधन केलं. अमरिंदर सिंह यांनी व्यासपीठावरून सिद्धू यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्य. मात्र सिद्धू यांनी आपल्या भाषणात एकदाही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला नाही. यावेळी सिद्धू यांनी शेतकऱ्यांपासून ड्रग्सपर्यंतचे सर्व मुद्दे उचलले. “मला सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. मी आज काँग्रेसचा प्रदेशाध्य आहे. आज शेतकरी, शिक्षक, डॉक्टर्स यांचा प्रश्न आहे. जिथपर्यंत हे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत या पदाला अर्थ नाही. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. मी त्यांचा वारसा घेऊन पुढे जात आहे. आज लोकांच्या हक्काची लढत आहे.”, असं पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी सांगितलं. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांच्यात जवळपास ४ महिन्यानंतर चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर मनीष तिवारी, प्रताप सिंह बाजवा आणि लाल सिंह उपस्थित होते.