नुकत्याच जाहीर झालेल्या पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी देशातील मतदान प्रक्रियेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे (बॅलट पेपर) पार पडल्या, ज्यामध्ये सत्ताधारी भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पंजाबमध्ये कमळ का फुलले नाही? कारण तिथे निवडणुका ईव्हीएमवर नाही तर मतपत्रिकेवर झाल्या, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ‘X’ या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी एक सविस्तर पोस्ट शेअर करत ईव्हीएम आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधातील लढा अधिक मजबूत करण्याचे आवाहन देशवासीयांना आणि विरोधी पक्षांना केले आहे.

पंजाबमध्ये ‘कमळ’ कोमेजले; मतपत्रिकेमुळे निकाल बदलले?

पंजाबमधील एकूण १,९७७ प्रभागांपैकी भाजपला केवळ १७२ जागांवर विजय मिळवता आला. म्हणजेच भाजपला एकूण जागांच्या १० टक्क्यांहून कमी जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसलेल्या अपक्ष उमेदवारांनी २५१ जागा जिंकून भाजपपेक्षा ७९ जागा अधिक मिळवल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत ईव्हीएमवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे. मात्र, पंजाबमध्ये मतपत्रिकेद्वारे निवडणूक होताच भाजपचा झालेला पराभव ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आणि पारदर्शकतेवर शंका उपस्थित करणारा ठरला आहे, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे.

प्रकाश आंबेडकरांचा न्यायालयाद्वारे थेट लढा

प्रकाश आंबेडकर गेल्या अनेक दशकांपासून ईव्हीएम विरोधात रस्त्यावरील आंदोलनांपासून ते थेट न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढत आहेत. केवळ वृत्तपत्रांत लेख लिहिणे किंवा माध्यमांसमोर विधाने करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी या विषयावर ठोस कायदेशीर पावले उचलली आहेत.

नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे यांनी निवडणूक आयोग आणि प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात कथितपणे वाढलेल्या सुमारे ७६ लाख अतिरिक्त मतांच्या गंभीर मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला असून, प्रशासनाला धारेवर धरले आहे.

लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजूट आवश्यक

सध्याची निवडणूक प्रक्रिया पूर्वीसारखी मुक्त आणि निष्पक्ष राहिलेली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएम आणि ‘एसआयआर’ (SIR) यंत्रणेचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

“जर देशातील लोकशाही, निवडणूक पारदर्शकता आणि मतदारांचे हक्क सुरक्षित ठेवायचे असतील, तर आता केवळ शाब्दिक विरोध करून चालणार नाही. सर्व विरोधी पक्षांनी आणि सजग नागरिकांनी एकत्रितपणे न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे गरजेचे आहे.” – प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

वेळ अद्याप पूर्णपणे टळलेली नाही. जर विरोधी पक्षांनी न्यायालयात निवडणूक आयोगाला जाब विचारला, तरच ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत देशातील जनतेच्या मनात असलेले संशयाचे ढग दूर होतील आणि भारतीय लोकशाही पुन्हा एकदा मुक्त व पारदर्शक होऊ शकेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीने समाज माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.