संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात एक नवी माहिती आता समोर आली आहे. पंजाब सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजपाचे नेते आणि वकील मास्टर मोहन लाल या प्रकरणात दोन मुख्य आरोपींची बाजू मांडणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मोहन लाल या खटल्यासाठी आरोपींकडून एक रुपयाही फी घेणार नाहीयेत.

मोहन लाल हे या खटल्यातील दोन मुख्य आरोपी सांझी राम आणि त्याचा मुलगा विशाल यांचा खटला लढणार आहेत. आरोपींनी माझ्याशी संपर्क केला होता, बचाव पक्षाची वकिली करण्याकडे राजकिय दृष्टीकोनातून पाहू नये, ते निरपराध आहेत हे सिद्ध करण्यासाठी मी हा खटला लढेल. कोणताही खटला लढण्यासाठी मी पैसे मागत नाही, असं ७१ वर्षांचे मोहन लाल म्हणाले.

पठाणकोट आणि कठुआ येथील प्रभावशाली व्यक्तीमत्त्व म्हणून मोहन लाल यांच्याकडे पाहिलं जातं. काही दिवसांपूर्वी कैद्यांनी तक्रार केल्यानंतर सत्र न्यायालयाने मोहन लाल यांना तुरूंगाचा दौरा कऱण्यास सांगितलं होतं, त्यांच्या भेटीनंतर कैद्यांकडून येणाऱ्या तक्रारी थांबल्या होत्या.

कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. पाच दिवसांनंतर आसिफाचा मृतदेह सापडला त्यानंतर मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. यात सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, चार पोलीस अधिकारी आणि एका अल्पवयीन व्यक्तीचा समावेश आहे.