करोना महामारीमुळे अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. यामुळे बर्‍याच राज्यांच्या सरकारने अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, पंजाब सरकारने देखील करोनामुळे अनाथ झालेले किंवा घरातील कमवता सदस्याचे निधन झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या मुलांना सरकारकडून पदवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. अभ्यासाचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. तसेच मुलांना सामाजिक सुरक्षा पेन्शन म्हणून दरमहा १५०० रुपये दिले जातील.

“पंजाबमध्ये ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना तसेच घरातील कमावत्या सदस्याला गमावले. त्या सर्वांना सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत पदवीपर्यंत नि:शुल्क शिक्षण दिले जाईल. असे करणे राज्याचे कर्तव्य आहे,” असे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले.

यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार २१ वर्षे वयोगटातील पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मदत उपाय उपलब्ध करुन देण्यात येतील. याअगोदर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी मोफत असेल.