पंजाब सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे १० रुपये आणि ५ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर आज रविवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याची घोषणा करताना, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, गेल्या २० वर्षांमध्ये राज्यात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झाली आहे.

“पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याने राज्य सरकारला वर्षाकाठी ८०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे,” असे पंजाबचे मंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी सांगितले. इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकारने ही घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. दरम्यान, केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली. उत्तर प्रदेशसह अनेक राज्य सरकारांनी इंधनाचे दर कमी केले. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील व्हॅट सात रुपये आणि डिझेलवर दोन रुपयांनी कमी करण्यात आला. अशा प्रकारे दोन्ही इंधनांच्या किमती येथे प्रतिलिटर १२-१२ रुपयांनी कमी झाल्या. त्यानंतर, कर्नाटक, गोवा, त्रिपुरा आणि आसामच्या सरकारांनी दोन्ही इंधनांनच्या करात आणखी कपात केली. या राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात प्रत्येकी सात रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे डिझेलच्या दरात प्रति लिटर १७ रुपये आणि पेट्रोलच्या दरात १२ रुपयांनी कपात करण्यात आली.