साखरपुड्यामध्ये हिऱ्याच्या अंगठीवरुन तुफान राडा; वर पक्षाच्या लोकांनी मुलीला केसाला धरुन ओढलं, पोलीस येण्याआधीच हॉलमधून फरार

त्यांनी वर पक्षाची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चानंतर वादामध्ये बदलली आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

diamond ring
हे प्रकरण थेट पोलिसांमध्ये गेलं आहे. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)
पंजाबमधील जालंधरमधील रामा मंडी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये सुरु असणाऱ्या साखरपुड्याच्या समारंभामध्ये हिऱ्याच्या अंगठीवरुन झालेला वाद थेट पोलीस स्थानकामध्ये पोहचलाय. हिऱ्याच्या अंगठीच्या मागणीवरुन हॉलवरच वर आणि वधू पक्षातील लोकांचा वाद सुरु झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की दोन्हीकडील मंडळी एकमेकांना हाणामारी करु लागले. हिऱ्याची अंगठी न दिल्याने साखरपुडा रद्द करण्यात आला. तर दुसरीकडे या हाणामारीमध्ये मुलाकडच्यांनी नवरीचे केस ओढून तिला मारहाण केल्याचा आरोप वधू पक्षाने केलाय. वर पक्षातील लोकांना मुलीकडच्यांकडून हिऱ्याची अंगठी न मिळाल्याच्या रागातून वधू पक्षातील लोकांना मारहाण केली, हॉटेलमध्ये धुडगूस घातला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर मुलीकडच्यांनी पोलिसांमध्ये रितरस तक्रार नोंदवली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता पोलीस याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीकडच्यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये साखरपुडा ठरवण्याआधी मुलाकडच्यांनी हिऱ्याच्या अंगठीची मागणी केली नव्हती. मात्र रविवारी या संमारंभादरम्यान जेव्हा वर आणि वधूने एकमेकांना अंगठी घालण्याची वेळ आली तेव्हा मुलाकडच्यांनी हिऱ्याची अंगठी, सोन्याचं कडं आणि कानातील वळ्याची मागणी मुलीच्या घरच्यांकडे केली.  मात्र ऐवढ्या ऐनवेळी केलेल्या या मागणीमुळे मुलीकडे गोंधळात पडले. त्यांनी वर पक्षाची समजून घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ही चर्चानंतर वादामध्ये बदलली आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. नंतर प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी दोघांची भेट घडवून आणणाऱ्याला बोलवण्यात आलं तेव्हा मुलाचं आधीच लग्न झालं असून त्याला दोन मुलं असल्याची माहिती समोर आली. त्याने आपल्या आधीच्या पत्नीला सोडून दिलं असून आता तो दुसरं लग्न करु इच्छित असल्याचं समोर आलं. यावरुन मुलीकडचे सर्वचजण चांगलेच संतापले.

मात्र मुलाकडच्यांनीच मुलीच्या नातेवाईकांना आणि मुलीला मारहाण करुन तिथून पळ काढला. आरोपपत्रामध्ये मुलाकडच्यांनी मुलीचे केस पकडून तिला मारहाण करुन खेचत नेल्याचंही म्हटलं आहे. पोलिसांना फोनवरुन यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होणार हे समजताच मुलाकडचे सर्वजण आपलं सामान आणि भेटवस्तू हॉलवरच सोडून पळून गेले. पोलिसांनी हॉटेल प्रशासनाकडून सर्व घटनाक्रम कैद झालेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपी अद्याप फरार आहेत. लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांनी न्यूज १८ शी बोलताना म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Punjab jalandhar engagement broke clash over diamond ring demand groom family brutally beat up girl scsg