पंजाबमधील जालंधर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका नामांकित महिला डॉक्टरने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. मीनाक्षी असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या कुटुंबाने तिचे पती डॉ. पियुष यांच्यावर मानसिक, शारीरिक छळ आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. डॉ. पियुष हे जालंधरमधील ‘नॅशनल आय हॉस्पिटल’चे मालक आहेत.
घराचे दरवाजे आतून बंद, पोलिसांची धाव
‘एनडीटीव्ही’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध वृत्तानुसार, डॉ. मीनाक्षी या काही काळापासून पतीपासून वेगळ्या राहत होत्या. बुधवारी त्यांचा मृतदेह खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घराचे सर्व दरवाजे आतून बंद असल्यामुळे, पोलिसांनी खिडक्यांच्या काचा फोडून आत प्रवेश केला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करिता पाठवण्यात आला आहे.
विवाहबाह्य संबंध आणि घरगुती हिंसाचार
डॉ. मीनाक्षी आणि डॉ. पियुष यांचा विवाह ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला होता. मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, डॉ. पियुष यांचे त्यांच्याच हॉस्पिटलमधील एका नर्ससोबत विवाहबाह्य संबंध होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे डॉ. मीनाक्षी यांना याबद्दल समजले होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. पियुष तिला वारंवार मारहाण करायचा आणि त्यानंतर तिच्या आईला फोन करून ‘मी मीनाक्षीला मारले, माझी चूक झाली,’ असे सांगायचा, असा आरोप मृत डॉक्टरच्या आईने केला आहे. या त्रासाला कंटाळून डॉ. मीनाक्षी जुलै २०२५ पासून पतीपासून वेगळ्या आणि एकट्या राहत होत्या.
स्वाक्षरीशिवाय २ कोटी ५ लाखांचे कर्ज; आर्थिक फसवणूक
डॉ. मीनाक्षी पतीपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या. याच महिन्यात त्या स्वतःचे नवीन घर खरेदी करणार होत्या. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्या गृहकर्जासाठी बँकेत गेल्या, तेव्हा त्यांना समजले त्यांच्या नावावर आधीच २ कोटी ५ लाखांचे रुपयांचे कर्ज सुरू होते. या कर्जातील काही रक्कम गाडीसाठी तर उर्वरित रक्कम पियुषच्या हॉस्पिटलसाठी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, या कर्ज मंजुरीच्या कागदपत्रांवर डॉ. मीनाक्षी यांची स्वाक्षरीच नव्हती. आपल्या संमतीशिवाय पतीकडून झालेल्या या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या.
पोलीस तपास सुरू
हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याबाबत कुटुंबीयांनी शंका उपस्थित केली आहे. “पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल,” असे मृत डॉक्टरच्या आईने म्हटले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी पती डॉ. पियुष याचा फोन बंद असून तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
