पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २६ मे रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला असून भाजपाला धक्का बसला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, १ हजार ७६५ प्रभागांपैकी ८६२ प्रभागांमध्ये ‘आप’ने दणदणीत विजय मिळवत १०२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवला आहे.
पंजाबमधील बहुसंख्य शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम आदमी पक्षाने विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं कौतुक केलं. तसेच पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशाबाबत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला डिवचलं आहे.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या विजयानंतर केजरीवाल यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. केजरीवाल म्हणाले की, लोकांनी भाजपाचा सूड घेतला आहे. तसेच केजरीवाल यांनी भाजपाचा ‘ईडी पार्टी’ असा उल्लेख केला. तसेच पंजाबमधील छोट्या व्यापाऱ्यांवर छापे टाकून लोकांना त्रास दिल्याचा आरोपही केजरीवाल यांनी भाजपावर केला.
केजरीवाल म्हणाले की, “पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मिळालेल्या शानदार विजयाबद्दल पंजाबच्या जनतेचे मनःपूर्वक आभार. सर्वांचे अभिनंदन. ऐतिहासिक मतदान करून जनतेनं भगवंत मान यांच्या सरकारच्या कार्याला दाद दिली आहे. आम्ही भविष्यातही याच पद्धतीने चांगली कामं करत राहू, “ईडी पक्ष पूर्णपणे संपला आहे. पंजाबमधील छोट्या व्यापाऱ्यांवर अनेक छापे टाकून लोकांना त्रास देणाऱ्या ईडी पक्षाचा आज जनतेने बदला घेतला आहे”, असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपाला डिवचलं आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की,”पालिकेच्या निवडणुकीत ‘आप’ने मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं आहे. जनतेने विरोधी पक्षाच्या द्वेषपूर्ण राजकारणाचा पराभव केला असून सत्ताधारी पक्षाच्या विकासवादी राजकारणाला पाठिंबा दिला आहे. विभाजनवादी राजकारण करणाऱ्या पक्षांना जनतेनं नाकारलं आहे. उष्ण तापमानात देखील लोकांनी रांगेत उभं राहून मतदान केलं आहे.”
