Punjab man set ablaze crime news latest update : कौटुंबिक वादानंतर पत्नीला तिच्या माहेरून परत घेऊन जाण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला, त्याच्या मेव्हण्याने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून, त्यावरून या भयंकर घटनेचा उलगडा झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्यातील लोपोके गावचा रहिवासी असलेला लवप्रीत सिंग, १३ जून रोजी तरनतारन जिल्ह्यातील संघा गावात आपल्या पत्नीच्या माहेरी गेला होता. लवप्रीत आणि त्याची पत्नी संदीप कौर यांचा विवाह सुमारे नऊ महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच एका वादानंतर संदीप कौर तिच्या माहेरी परतली होती आणि तेव्हापासून ती तिथेच राहत होती. लवप्रीत आपल्या पत्नीला परत नेण्यासाठी समजूत काढत असताना, त्याचा मेव्हणा साजन सिंग याच्यासोबत त्याचा वाद झाला. काही वेळातच त्यांच्यात झटापट सुरू झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती लवप्रीतच्या अंगावर पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ ओतताना आणि नंतर लायटरने त्याला आग लावताना दिसत आहे.
आग अत्यंत वेगाने पसरली आणि आगीच्या ज्वालांमध्ये घेरले गेल्याने लवप्रीत आणि गुरजित कौर (लवप्रीतची मेव्हणी) दोघेही घाबरून पळताना दिसले. या आगीत गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान लवप्रीतचा काही वेळाने मृत्यू झाला. लवप्रीतला वाचवण्यासाठी पुढे आलेली त्याची मेव्हणी गुरजित कौर हिचाही गंभीर भाजल्यामुळे काही दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांची कारवाई
वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, आरोपी साजन सिंग यालाही या आगीत गंभीर दुखापत झाली होती, मात्र उपस्थित लोकांनी त्याला वाचवले. पोलिसांनी आरोपी साजन सिंग याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. याव्यतिरिक्त, मृत लवप्रीतची पत्नी संदीप कौर हिलाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
