Harjot Singh Bains resignation Demand: नीट पेपरफुटी प्रकरणी ३६ दिवस आंदोलन केल्यानंतर शनिवारी अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. प्रधान यांच्या राजीनाम्याचे प्रकरण ताजे असताना आता पंजाबमध्ये राजकारण तापले आहे. पेपरफुटी प्रकरणावरुन भाजपाने पंजबाचे शिक्षण मंत्री हरजोत सिंग बैन्स यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विविध परीक्षांचे पेपर फुटल्याचा दावा भाजपाने केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी मात्र पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारींनी केले आरोप
“पंजाबचे शिक्षणमंत्री राजीनामा कधी देणार? अरविंद केजरीवाल नैतिकतेच्या आधारावर पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा कधी मागणार?” असा प्रश्न भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी विचारला. भंडारी यांनी पीएसईबी इयत्ता १२ वी इंग्रजी बोर्ड परीक्षा, पंजाब राज्य शिक्षक पात्रता चाचणी (पीएसटीईटी) आणि कृषी विकास अधिकारी (एडीओ) परीक्षेत पेपरफुटी झाल्याचा आरोप केला आहे.
विविध परीक्षांमध्ये गैरप्रकाराचा आरोप
भंडारी यांनी पंजाब सेवा निवड मंडळ (पीएसएसएसबी) गट-ब आणि संयुक्त भरतीमध्ये अनियमितता झाल्याचाही आरोप केला. नायब तहसीलदार आणि फार्मसी ऑफिसर भरती परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच उत्पादन शुल्क आणि कर तपासणी गुणवत्ता यादीत बनावट नावे आढळल्याचा आरोपही भंडारी यांनी केला आहे.
काँग्रेसचाही आरोप
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनीही गेल्या चार वर्षांत सहा मोठ्या पेपरफुटी झाल्याचा आरोप केला आहे. “पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत बैन्स राजीनामा कधी देणार? चार वर्षे झाली. ६ मोठ्या परीक्षेत पेपरफुटी झाली. असंख्य स्वप्ने उद्ध्वस्त झाली. तरीही कोणी जबाबदारी घेतली नाही. पंजाबच्या विद्यार्थ्यांना उत्तरे हवी आहेत,” असे सिंग म्हणाले. दरम्यान, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळले आहेत.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी फेटाळले आरोप
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गेल्या साडेचार वर्षांत पेपरफुटी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन ठिकाणी परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रयत्न झाल्याते त्यांनी मान्य केले. “आम्हाला दोन ठिकाणांहून कॉपीच्या तक्रारी मिळाल्या, पण पंजाबमध्ये एकही पेपरफुटी झाली नाही. आम्ही कॉपीच्या गैरप्रकारावर १० मिनिटांत कारवाई केली”, असे मान म्हणाले. आप नेते बलतेज पन्नू यांनी देखील पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावले.
