गेल्या आठवड्यातच एका यूट्यूबरच्या आईने आपल्या पाळीव कुत्र्याला फुग्यांना बांधल्याप्रकरणी अटक झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये देखील कुत्र्याला निर्दयी पद्धतीने एका स्कूटरच्या मागे बांधून फरफटत नेल्याचं स्पष्ट झालं आहे. या कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्कूटर चालवणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबमध्ये हा प्रकार घडला असून २० जून रोजी त्याची नोंद झाल्याचं एएनआयनं दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

पंजाबच्या पटियालामधला हा सगळा प्रकार आहे. शहराच्या सेंच्युरी एनक्लेव्ह भागामध्ये २० जून रोजी दोन महिला स्कूटरवरून जाताना प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्या. स्कूटरच्या मागच्या बाजूला एका कुत्र्याला बांधलं होतं. मागे बसलेल्या महिलेने दोरी घट्ट पकडून ठेवली होती आणि या महिला या कुत्र्याला फरफटत घेऊन जात होत्या. विशेष म्हणजे, आसपासच्या लोकांनी अडवून देखील त्या कुत्र्याला तशाच प्रकारे नेत राहिल्या.

दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल

बराच काळ हा सगळा अघोरी प्रकार केल्यानंतर या महिलांनी कुत्र्याला सोडून दिलं. हा कुत्रा गंभीररीत्या जखमी झाला होता. एका एनजीओनं कुत्र्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनेच्या ४ दिवसांनी म्हणजेच २४ जून रोजी या कुत्र्याचा मृत्यू झाला. पतियाळाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिलांविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्या आला आहे. २० जून रोजी ही घटना घडल्यानंतर २४ जून रोजी कुत्र्याचा मृत्यू झाला. यानंतर हा गुन्हा संबंधित महिलांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

 

नेटिझन्समध्ये संताप

दरम्यान, हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर नेटिझन्सनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहींनी मानवता संपत चालल्याची भिती व्यक्त केली…

 

तर काही नेटिझन्सनी प्राणी देखील पर्यावरणाचा एक हिस्सा असल्याचं ट्वीट केलं आहे.

 

एका ट्विटर युजरनं या घटनेवर संताप व्यक्त करतानाच असं करणाऱ्यांना न्यायालयानं कठोर शिक्षा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये गौरव शर्मा नावाच्या एका यूट्यूबरची आई गीता शर्मा यांनी आपल्या पाळीव कुत्र्याच्या पाठीला फुगे बांधून तो हवेत उडू शकतो का हे बघण्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. नंतर आपल्या मुलाने त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी हा व्हिडीओ बनवल्याचं या महिलेनं सांगितलं. या महिलेला अटक केल्यानंतर काही दिवसांनी सोडून देण्यात आलं होतं.