भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना शुक्रवारी सकाळी पंजाब पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या अटकेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी आलेल्या पंजाब पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, बग्गा यांना अटक करून पंजाबला घेऊन जाणारा पोलिसांचा ताफा हरयाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रात अडवला. सीएम केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

बग्गा यांना अटक केल्यानंतर पंजाब पोलीस त्यांना मोहालीला घेऊन जात होते. हरियाणा पोलिसांचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिसांच्या सूचनेनुसार पंजाब पोलिसांनी रोखले आहे. पंजाब पोलिसांचे पथक कुरुक्षेत्रात चौकशी करत आहे. पंजाब पोलिसांच्या ताफ्याला हरयाणामध्ये रोखल्यानंतर भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना दिल्लीत परत नेण्यात आले आहे. हरयाणा पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांना थांबवण्यात आले कारण दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर योग्य प्रक्रिया न पाळल्याचा आरोप केला आहे. भाजपा नेत्याच्या अटकेनंतर पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल सूडाचे राजकारण करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

बग्गा यांना दिल्लीत अटक केल्यानंतर भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे. तजिंदरपाल सिंग बग्गा यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी जनकपुरी पोलिस ठाण्याबाहेर जमून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.