कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री चरणजीसिंग चन्नी यांच्यासोबत नवजोतसिंग सिद्धू यांचे असलेले मतभेद मिटल्यानंतर आता पंजाबमधील राजकीय वातावरण काहीसं शांत होईल असं वाटू लागलं होतं. मात्र, राजकीय विश्लेषकांची ही अपेक्षा फोल ठरवत नवजोतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबमधील राजकीय वातावरण ढवळून काढायला सुरुवात केली आहे. यावेळी नवजोत सिंग सिद्धू यांनी थेट राज्याचे महाधिवक्ता एपीएस देओल आणि पोलीस महासंचालक सहोटा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत या दोघांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार नसल्याचा अल्टिमेटमच सिद्धू यांनी पंजाब राज्य सरकारला दिला आहे.

नवजोतसिंग सिद्धू आणि देओल, सोहोटा यांच्यातल्या वादामुळे पुन्हा एकदा सिद्धू विरुद्ध पंजाब सरकार असा वाद उभा राहिला आहे. त्यात राज्याचे महाधिवक्ता एपीएस देओल यांनी जाहीररीत्या सिद्धूंवर परखड शब्दांमध्ये टीका केल्यामुळे हा वाद देखील थोडक्यात मिटणार नाही, हेच स्पष्ट झालं आहे. २०१५ साली शिखांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोलिसांना पाठिशी घालणे आणि पोलीस फायरिंग प्रकरणातील पोलिसांवर कारवाई न करणे यासाठी सिद्धू यांनी डीजीपी सोहोटा आणि देओल यांना दोषी धरलं आहे आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

“राजकीय हेतूने सिद्धूंची टीका”

सिद्धू यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता देओल यांनी थेट निशाणा साधला आहे. “त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांमध्ये वरचढ होण्याची संधी मिळावी, म्हणून नवजोत सिंग सिद्धू चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत”, असा आरोप देओल यांनी केला आहे.

“पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हेतुपुरस्सर राज्यात काँग्रेसची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न आहे. राजकीय हेतूने हे सर्व होत असून त्यासाठी पंजाबच्या महाधिवक्त्यांच्या कार्यालयाचं देकील राजकीयीकरण केलं जात आहे”, असं देखील देओल यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे नवजोत सिंग यांनी गेल्या महिन्यात पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बऱ्याच मनधरणीनंतर आणि पक्षश्रेष्ठींनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर मतभेद मिटवून दोघे एकत्र दिसून आले होते. दोनच दिवसांपूर्वी नवजोतसिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर तो मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र, जोपर्यंत महाधिवक्ता एपीएस देओल आणि पंजाबचे पोलीस महासंचालक सोहोटा यांना पदावरून हटवण्यात येत नाही, तोपर्यंत प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार नाही, असा अल्टिमेटम सिद्धूंनी दिला आहे. त्यांचं पत्र मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पोहोचलं असून त्यावर मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.