पंजाबमध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका पाच महिन्यांच्या गरोदर महिलेला तिच्या वडील आणि भावाने रात्रभर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिला कालव्यात फेकून दिले. मात्र, महिलेने पाण्यात बुडाल्याचे भासवून हल्लेखोरांची दिशाभूल केली आणि नंतर पोहत कालव्याच्या काठावर पोहोचत आपला जीव वाचवला. २२ वर्षीय अमनप्रीत कौर सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी तिच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

कुटुंबाच्या विरोधात जाऊन दलित तरुणाशी लग्न

अमनप्रीतने जवळपास तीन वर्षांपूर्वी कुटुंबाच्या विरोधात जाऊन सतनाम सिंह याच्याशी लग्न केले होते. अमनप्रीत जाट शीख समाजातील असून सतनाम दलित समाजातील आहे. दोघेही गिद्दडबाहा जवळील कराईवाला गावचे रहिवासी आहेत. लग्नानंतर दोघांना जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ ते गावापासून दूर राहिले. मात्र, काही काळापूर्वी ते पुन्हा गावात परतले. त्यानंतर अमनप्रीतच्या कुटुंबीयांकडून पुन्हा धमक्या मिळत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

६ सप्टेंबरच्या रात्री हल्ल्याला सुरुवात

अमनप्रीतने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ६ सप्टेंबरच्या रात्री तिचे वडील, भाऊ आणि चुलत भावांनी तिच्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर अमनप्रीतला तिच्या कुटुंबीयांनी जबरदस्तीने बरोबर नेले आणि रात्रभर मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. कुटुंबीयांनी तिच्यावर पतीविरोधात लिखित जबाब देण्यासाठी दबाव आणला. मात्र, तिने त्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळी कालव्यात फेकले

७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अमनप्रीतच्या वडील आणि भावाने तिला श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील राजस्थान फीडर कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, हल्लेखोरांना आपण बुडाल्याचा विश्वास वाटावा म्हणून ती काही काळ पाण्याखालीच राहिली. हल्लेखोर निघून गेल्यानंतर तिने पोहत कालव्याचा काठ गाठला आणि बाहेर आली. कालव्याजवळून जाणाऱ्या नागरिकांनी तिला पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिला प्राथमिक उपचारांसाठी लांबी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘लग्नानंतर सतत धमक्या मिळत होत्या’

अमनप्रीतचा पती सतनाम सिंह याने सांगितले की, उच्च न्यायालयाच्या संरक्षणाच्या आदेशानंतरही लग्न झाल्यापासून पत्नीच्या कुटुंबीयांकडून त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. हल्ल्यात आपल्यालाही दुखापत झाल्याचा दावा सतनामने केला. डोक्यावर वार झाल्याने आपण बेशुद्ध पडलो होतो, असे त्याने सांगितले. तसेच त्याच्या कुटुंबीयांवर तलवारी आणि इतर शस्त्रांनी हल्ला झाला असूनही पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले नसल्याचा आरोप त्याने केला.

वडील, भाऊ आणि चुलत भावांसह सहा जणांवर गुन्हा

श्री मुक्तसर साहिबचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अभिमन्यू राणा यांनी गुन्हा दाखल करण्यात कोणताही विलंब झालेला नसल्याचे स्पष्ट केले. महिलेचे वडील, भाऊ आणि चुलत भावांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासह घरात बेकायदेशीर प्रवेश आणि इतर संबंधित गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली आहेत.

दोन महिन्यांतील तिसरी घटना

कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केल्याच्या कारणावरून महिलेला किंवा तिच्या पतीला लक्ष्य करण्याची ही दोन महिन्यांतील तिसरी घटना असल्याचे समोर आले आहे.

३० ऑगस्ट रोजी पंजाबमधील तरनतारन बसस्थानकाबाहेर २२ वर्षीय जगजीत सिंह याची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्याने व त्याच्या पत्नीच्या पळून जाऊन लग्न केले होते. पत्नीच्या भावांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून एका भावाला घटनास्थळी अटक करण्यात आली, तर दुसरा फरार झाला.

त्याआधी २१ जुलै रोजी फरिदकोट जिल्ह्यात २० वर्षीय मेहकप्रीत कौरची तिच्या वडिलांसह काही नातेवाईकांनी चाकूने हत्या केल्याचा आरोप होता. तिनेही कुटुंबाच्या इच्छेविरोधात लग्न केले होते आणि या जोडप्याने उच्च न्यायालयाकडे संरक्षण मागितले होते. या प्रकरणात वडिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली.