Punjab Police framing video heroin case SIT Probe :पंजाबमधील खन्ना येथे शिवसेना नेते महंत काश्मीर गिरी यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. गिरी यांच्या घरात गादीखाली एक पाकीट ठेवताना साध्या वेशातील पोलिस कर्मचारी दिसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणाहून पोलिसांनी हेरॉइन जप्त केल्याचा दावा करत गिरी यांना अटक केली होती. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक सुखदेव सिंह यांना निलंबित करण्यात आले असून, गिरी यांना प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

खन्नाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दर्पण अहलुवालिया यांनी या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. रविवारी गिरी यांच्या घराची झडती घेणाऱ्या अन्य पोलिस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं?

खन्नाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक दर्पण अहलुवालिया यांनी या प्रकरणाची माहिती दिली. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये साध्या वेशातील एएसआय सुखदेव सिंह एका खोलीत जाऊन गादीखाली काहीतरी ठेवताना स्पष्ट दिसत आहेत. त्यानंतर पोलिसांनी या झडतीदरम्यान त्याच गादीखालून सुमारे ३० ग्रॅम हेरॉइन जप्त केल्याचा बनाव रचून गिरी यांना अटक केली होती. गिरी यांचा चालक गुरजंत सिंह याच्या चौकशीत नाव आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, घरातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर एएसआयला निलंबित करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

गिरी यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल

महंत काश्मीर गिरी यांच्याविरोधात यापूर्वीही पंजाब आणि दिल्लीमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन, फसवणूक, तोतयागिरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या आरोपांचा त्यात समावेश आहे. खन्ना येथे त्यांच्या विरोधात पाच, तर दिल्लीमध्ये एक अशा किमान सहा एफआयआर दाखल असल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून गिरी आणि त्यांच्या चार साथीदारांना अटक केली होती. त्यावेळी या टोळीकडून १.१५ किलो हेरॉइन जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. रोपड तुरुंगात बंद असलेला कथित अमली पदार्थ तस्कर लवप्रीत सिंह हा या रॅकेटचे संचालन करत होता आणि गिरी त्याच्या सतत संपर्कात होते, असे पोलिसांनी म्हटले होते.

२०२१ मध्ये सुरक्षा मिळवण्यासाठी स्वतःवरच खोटा हल्ला घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तसेच २०२३ मध्ये त्यांच्या मुलांनी सीजीएसटी अधिकारी असल्याचे भासवून १० किलो सोने लुटल्याप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गिरी हे शिवसेनेच्या पंजाब शाखेचे माजी राष्ट्रीय प्रचारक असून, त्यांनी स्वतःची खालिस्तानविरोधी संघटनाही स्थापन केली आहे.