scorecardresearch

दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ अपघातात मृत्यू

शेतकरी आंदोलनात लाल किल्याच्या परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले होते

(संग्रहीत छायाचित्र)

पंजाबी अभिनेता आणि शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ला परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. सोनीपत पोलिसांनी दीप सिद्धूच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

रस्ता अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. वेस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वेवर हरियाणातील खरखोडाजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

दीप सिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता होता. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला होता. त्याने कायद्याची पदवी घेतली. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही राहिला होता. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला होता. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं होतं. महत्त्वाचं म्हणजे भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही स्पष्ट केलं होतं.

दीप सिद्धू शेतकरी आंदोलनात कसा आला?

शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि कलाकार शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले. या कलाकारांमध्ये एक दीप सिद्धूही होता. दिल्ली-हरयाणा सीमेवरील शंबू येथे तो शेतकऱ्यांबरोबर धरणे देत होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjabi actor deep sidhu dies in a road accident near sonipat in haryana msr