Manjeet Kaur Influencer Murder case: अपहरण करून झाडाला बांधून पेटवून देण्यात आलेल्या मनजीत कौर (वय २८) या प्रसिद्ध पंजाबी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चंदीगड येथील ‘पीजीआयएमईआर’ या सरकारी रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. २६ ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अखेर अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस प्रशासनाच्या संथ कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
नेमकी घटना काय?
मनजीत कौर यांच्या आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ आणि ४ जुलैच्या मध्यरात्री शुभी आणि पिंडा नावाच्या दोन परिचितांनी मनजीत कौरला चंदीगडमधील सेक्टर ३४ येथे भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेण्यात आले. आरोपींनी तिला पंजाबमधील मोरिंडा परिसरातील एका जंगलात नेले. तिथे तिला एका झाडाला बांधून पेटवून दिले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.
एका व्यक्तीने घटनास्थळी धाव घेत ब्लँकेटच्या साहाय्याने आग विझवली. गंभीररीत्या भाजलेल्या मनजीत कौरला सुरुवातीला मोरिंडा येथील रुग्णालयात आणि नंतर मोहालीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला चंदीगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात हलवण्यात आले होते.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात खरार सदर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान मनजीत कौर शुद्धीवर आली होती आणि तिला घडलेल्या घटनेबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवायचा होता. ‘पीजीआय’ पोलीस चौकीने संबंधित तपास अधिकाऱ्याला याविषयी अधिकृत माहिती देऊनही तपास अधिकारी जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात पोहोचले नाहीत, असा आरोप होत आहे. याबाबतची नोंद पोलीस डायरीत करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ती दोन महिने मृत्यूशी झुंज देत असतानाही या प्रकरणी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
मृत्यूनंतर अखेर गुन्हा दाखल
२६ ऑगस्ट रोजी मनजीत कौरचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. तिच्या मृत्यूनंतर आई कांता देवी यांच्या तक्रारीवरून चंदीगडमधील सेक्टर ३४ पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, हत्येमागील हेतू अद्याप कळलेला नाही. मनजीत कौरचे इन्स्टाग्रामवर १.४६ लाक फॉलोअर्स होते. पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांवर व्हिडीओ तयार करणाऱ्या मनजीत कौरला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळत असे.
