अनिवासी भारतीय दाम्पत्याला १०० पेक्षा जास्त जणांच्या समुहाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिमाचल प्रदेशमधील डलहौजी येथे ही घटना घडली. गाडीच्या पार्कींगवरून हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पीडित दाम्पत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या बरी आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित दाम्पत्य हे मुळचे पंबाजामधून असून ते गेल्या २५ वर्षांपासून स्पेनमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वीच परिवारातील सदस्यांच्या भेटीसाठी ते भारतात दाखल झाले. यावेळी हिमाचल प्रदेशातील डलहौजी येथे फिरत असताना गाडी पार्क करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा स्थानिकांशी वाद झाला. या वादानंतर १०० पेक्षा जास्त जणांनी त्यांना मारहाण केली.

हेही वाचा – सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

दरम्यान, पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात त्यांनी घटनास्थळी दाखल होत दाम्पत्याला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात बोलताना आपण केवळ पंजाबी असल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा या पीडित दाम्पत्याने केला आहे.

या घटनेनंतर पंजाबचे अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री कुलदीप सिंग धालीवाल, अमृतसरचे खासदार गुरजित सिंग औजला आणि अकाली नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी रुग्णालयात जाऊन पीडित दाम्पत्याची भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी हिमाचल प्रदेश सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना अमृतसरचे खासदार गुरजित सिंग औजला आणि अकाली नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी याप्रकरणाचा थेट संबंध हिमाचल प्रदेशाच्या मंडी येथील खासदार कंगणा रणौत यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी जोडला. ते म्हणाले, ज्यावेळी आम्ही पीडित दाम्पत्याला भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की मारहाण होत असताना हल्लेखोर सातत्याने कंगणा रणौत यांचे नाव घेत होते. इतकंच नाही, ‘तुम्ही कंगना बरोबर जे केलं, तेच आम्ही तुमच्याबरोबर करू’ असंही हल्लेखोरांनी म्हटल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – तुरुंगातून निवडणूक लढवली अन् जिंकलीही; अमृतपाल सिंग आणि अब्दुल राशिद शेख खासदारकीची शपथ कशी घेणार?

याप्रकरणी त्वरीत गुन्हा दाखल करून हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी माहिती पंजाबमधील काँग्रेसच्या नेत्यांनी आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्रदेखील लिहिलं आहे.