नवी दिल्ली  : शस्त्रास्त्रे, लष्करी साधने आदींच्या ७९६५ कोटी रुपये खर्चाच्या खरेदी व्यवहारास संरक्षण खात्याने मंगळवारी मंजुरी दिली आहे. यात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून लिंक्स यू२ नाविक गोळीबार नियंत्रण यंत्रणा खरेदी करण्यासह हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा समावेश आहे. ही हेलिकॉप्टर ‘लाइट युटिलिटी’ प्रकारातील असतील, असे संरक्षण खात्याच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. संरक्षण संपादन परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या  प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.ने केलेल्या डॉरनिएर विमानांच्या सुधारित आराखड्यासही मान्यता देण्यात आली. आत्मनिर्भर भारताचे ध्येय लक्षात घेता, भारत हेवी इलेक्ट्रिक लि.कडून सुधारित दर्जाचे सुपर रॅपिड गन माऊंट तयार केले जात असल्याने यापुढे नौदलासाठी या वर्गवारीत परदेशातून खरेदी केली जाणार नाही.