Russia Ukraine War Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता, रशियाने देखील युक्रेनविरोधातील युद्धात दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऑर्थोडॉक्स इस्टरनिमित्त दोन दिवसांच्या कालावधीसाठी युद्धविरामाची घोषणा केली आहे. युक्रेनने देखील युद्धविरामाचे पालन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
क्रेमलिनने युद्धविरामाबाबत काय म्हटलंय?
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार, “ऑर्थोडॉक्स इस्टरच्या येऊ घातलेल्या सणाच्या निमित्ताने, ११ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते १२ एप्रिल रोजी दिवसअखेरपर्यंत युद्धविराम जाहीर करण्यात येत आहे,” असे क्रेमलिनच्या घोषणेत म्हटले आहे. युक्रेन देखील रशियन फेडरेशनचे अनुसरण करेल, या आधारावर आम्ही पुढे जात आहोत, असेही क्रेमलिनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन दिवस लष्करी कारवाई बंद ठेवण्याचे आदेश
रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री अँड्री बेलौसोव्ह यांनी रशियाचे सर्वोच्च कमांडर, चीफ ऑफ द जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, शत्रू राष्ट्राकडून कुठलाही प्रकारला हल्ला अथवा गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही संरक्षण मंत्री अँड्री बेलौसोव्ह यांनी स्पष्ट केले आहे. पण, रशियाकडून जाहीर करण्यात आलेल्या युद्धविरामाबाबत युक्रेनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
महत्वाचा सण
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आठवड्याभरापासून इस्टरच्या दिवशी युद्धविराम करण्याची मागणी केली होती. तसा प्रस्ताव त्यांच्याकडून मांडण्यात आला होता. पण, रशियाकडून ड्रोन हल्ले सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांमध्ये ऑर्थोडॉक्स इस्टरचे मोठे महत्व आहे. मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. सणाचे महत्व लक्षात घेता रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. आता युक्रेन याबाबत काय निर्णय घेणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
