युक्रेनच्या पूर्व भागातील रशियन फौजा अशांतता निर्माण करीत असल्याचा आरोप फेटाळून लावतानाच तेथे आपल्या फौजा पाठविल्या जाणार नाहीत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सांगितले. मात्र युक्रेनच्या क्रायमिया प्रांतावर आपण कब्जा करण्यापूर्वी साध्या वेशात असलेले सैन्य आपलेच होते, याची प्रथमच कबुलीही पुतिन यांनी दिली.
दरम्यान, युक्रेनला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांची मोठी किंमत रशियास चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे.
शीतयुद्ध निर्माण झाल्यानंतर पूर्व आणि पाश्चिमात्यांमध्ये निर्माण झालेल्या या सर्वात वाईट अशा तणावावर शांततापूर्ण, राजकीय आणि मुत्सद्दी पातळीवर तोडगा निघाल्यास तेथे आपण सैन्य धाडणार नाही, असे पुतिन यांनी सूचित केले.
युक्रेनला अस्थिर करण्याचा प्रयत्न रशियाने केल्यास त्यांना परिणामांना तोंड द्यावे लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबाम यांनी दिला. मात्र अमेरिकेच्या श्रेष्ठ लष्करामुळे रशिया लष्करी संघर्षांत उतरणार नाही, असेही ओबामा म्हणाले.