रशिया आणि भारतातील ऐतिहासिक आणि मैत्रीचा रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पूतिन यांनी पुन्हा एकदा गौरव केला आहे. भारताला रशियासोबतचे सहकार्य कमी करण्यासाठी भाग पाडण्याचे पाश्चात्त्य देशांचे अमेरिकेसह इतर देशांचे पुर्णपणे व्यर्थ आहेत. एवढेच नाही तर भारतासारख्या देशावर असा दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंधासाठी अत्यंत घातक आहे. असे पुतीन यांनी पाश्चात्त्य देशांना खडे बोल सुनावले आहेत.

सेंट पीटर्सबर्ग येथे ‘पीटीआय’ या भारतीय वृत्तसंस्थेसह जगातील प्रसिध्द वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी बोलताना पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे आणि आर्थिक प्रगतीचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

भारताच्या वेगवान आर्थिक विकासाचा उल्लेख करत राष्ट्राध्यक्ष पुतीन म्हणाले, “भारत सध्या जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि देश अत्यंत प्रभावी दराने प्रगती करत आहे. ही प्रगती अशीच अचानक झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलेल्या कठोर परिश्रमांचा हा थेट परिणाम आहे.” आगामी काळात रशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत स्वतःचे हित ओळखणारा ‘विश्वासू मित्र’

अमेरिकेसोबत वाढणाऱ्या भारताच्या जवळकीमुळे रशिया आणि भारताच्या संबंधांवर काही परिणाम होईल का? असा प्रश्न पुतीन यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध हे रशियासोबतच्या मैत्रीत कोणताही अडथळा आणू शकत नाहीत.

“भारत हा एक महान देश आणि मोठी लोकशाही आहे. रशिया भारताला आपला एक अत्यंत विश्वासू भागीदार मानतो. भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी ज्या देशांशी संबंध ठेवणे गरजेचे समजतो, त्या सर्व देशांशी तो आपले संबंध वाढवत आहे आणि याचा आम्हाला आनंदच आहे,” असे पुतीन म्हणाले.

पाश्चात्त्य देशांचे प्रयत्न अपयशी

रशियासोबतचे संबंध तोडण्यासाठी पाश्चात्त्य देशांकडून भारतावर सातत्याने दबाव आणण्याचे प्रयत्न झाले आहेत, हे पुतीन यांनी मान्य केले. मात्र, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर दबाव आणणे आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी किती नुकसानकारक ठरू शकते, हे आता सर्वांनाच समजले आहे,” असे म्हणत त्यांनी पाश्चात्त्य देशांना थेट इशारा दिला. भारताच्या इतर देशांसोबत असलेल्या संबंधांमुळे रशियावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, उलट रशिया भारतासोबतचे आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करत राहील, असा निर्धार पुतीन यांनी शेवटी व्यक्त केला.