रशियाशेजारच्या युक्रेनमध्ये रशियाधार्जिणे सैन्य आणि सरकारी फौजा यांच्यात शुक्रवारी शस्त्रसंधी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी आपल्या सैन्याला युद्धसज्ज राहण्याचा आदेश दिला.
युक्रेनमध्ये गेले काही दिवस बंडखोर, रशियाधार्जिणे सैन्य आणि युक्रेनचे सैन्य यांच्यात घमासान चकमकी सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे ३०० जण मृत्युमुखी पडले असून ३४ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. या चकमकी थांबाव्यात आणि शांततेला पोषक वातावरण निर्माण व्हावे या हेतूने युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांनी शुक्रवारी शस्त्रसंधी घोषित केला.
मात्र, हा शस्त्रसंधी रशियाने धुडकावून लावला आहे. हा शस्त्रसंधी नसून रशियाला दिलेला ‘अंतिम इशारा’च आहे. बंडखोरांबरोबर चर्चा करण्यासाठी आश्वासक असा कोणताही प्रस्ताव त्यात नाही, असा आक्षेप रशियाने घेतला. या साऱ्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी अध्यक्ष पुतिन यांनी आपल्या सैन्याला युद्धसज्ज होण्याचा आदेश दिला. रशियाई लष्कराच्या मध्य विभागाला हा युद्धसज्जतेचा आदेश देण्यात आला आहे. युद्धसज्जतेचा हा आदेश पुढील शनिवापर्यंत अमलात राहणार आहे. या युद्धसज्जतेच्या काळात रशियाचे सैन्य लष्करी कवायती करणार असून त्यात सुमारे ६५ हजार सैनिक सहभागी होणार आहेत.